मी अपयशाला घाबरत नाही : तुकाराम मुंढे
By Admin | Updated: March 6, 2017 03:55 IST2017-03-06T03:55:40+5:302017-03-06T03:55:40+5:30
काम करताना जेव्हा तुम्ही बदलीचा विचार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या उद्देशापासून दूर जाता

मी अपयशाला घाबरत नाही : तुकाराम मुंढे
प्रज्ञा म्हात्रे,
ठाणे- काम करताना जेव्हा तुम्ही बदलीचा विचार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या उद्देशापासून दूर जाता. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्यासाठी तुमच्या हातात तीन वर्षे असतात. त्यात चांगले काम करा. मला अपयशाची कधीही भीती वाटत नाही. आणि मी मरणालाही भीत नाही. जशी अपयशाची भीती वाटायला नको, तसेच यशही डोक्यात जाता कामा नये, असा मोलाचा सल्ला नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वैशाली पाटील व विश्राम वैद्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते मनमोकळेपणे बोलत होते. स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडविताना जो प्रश्न विचारला त्याला अनुसरून उत्तरे न लिहीता मुले जी माहिती त्यांना ठावूक अहे, ती लिहितात. ही परीक्षा तुमचे ज्ञान तपासण्यासाठी नाही. प्रश्नपत्रिका समजून अभ्यास केला, तर परीक्षेत काय विचारले जाते त्या अनुषंगाने अभ्यास करता येईल. तुम्ही परीक्षार्थी बना. अभ्यास करण्यापेक्षा प्रिपरेशन करा. परीक्षेत पास व्हायचे असेल; तर विषयाचा नव्हे तर त्या परीक्षेचा अभ्यास करा, असा कानमंत्रही त्यांनी दिला. मी प्रवाहाविरुद्ध पोहत नाही. परंतु प्रवाह ज्या दिशेने वाहणे अपेक्षित आहे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यावर टीका होत असेल; तर त्या टीकेला उत्तर न देता तिचे सिंहावलोकन करा. त्या टीकेत तथ्य नसेल तर ते चुकीचे आहे, हे पटवून द्या आणि तरीही तुम्हाला विरोध होत असेल तर मात्र दुर्लक्ष करा, असा अनुभव त्यांनी सांगितला. मी स्वत:ला कधीही वेळ देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जे स्वत:ला वेळ देतात ते निश्चितच पुढे जातात आणि अशांचे हुनर कधीही लपत नाही. एकही अधिवेशन नाही, ज्यात माझी चर्चा झाली नाही. मग ती वाईट किंवा चांगल्या कारणांसाठी असो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्पर्धा परीक्षा द्यायच्या की नाही हा विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो. तुमच्या जीवनात तुम्हाला काय करायचे हे जोपर्यंत तुम्ही स्वत:ला विचारणार नाही, त्याचे उत्तर शोधणार नाही; तोपर्यंत तुम्हाला मार्ग सापडणार नाही. सोबतच त्यांनी त्यांचे प्रशासकीय सेवेतील अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. मी फावला वेळ काढू शकतो, पण मानसिकरित्या हा फावला वेळ मिळत नाही. मी सतत विचार करीत असतो.
>तरीही मी बेस्टच असतो!
प्रशासनात नसतात; तर कोणत्या क्षेत्रात असता यावर उत्तर देताना मुंढे म्हणाले, मी खाजगी क्षेत्रातील प्रशासनात असतो. पण ज्या कोणत्या क्षेत्रात असतो तिथे मी बेस्टच असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. बिनधास्तपणा असावा पण तो रेग्युलेटेड असावा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सेल्फी विथ आयुक्त
मुंढे हे मुलाखत संपून व्हीआयपी रुममध्ये गेले तेव्हा सभागृहाबाहेर त्यांना भेटण्यासाठी मुलांनी रांग लावली. व्हीआयपी रुममधून ते बाहेर येताच मुलांनी घोळका केला. कोणी त्यांचा मोबाईल नंबर घेतला, तर कोणी स्पर्धा परीक्षांबाबत शंका विचारल्या.
रंगली मुंढे सरांची शाळा
मुलाखत संपल्यावर उत्सुकांनी अनेक प्रश्न विचारले. पण त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी विद्यार्थ्यांवर प्रश्नांचे चेंडू फेकले. विद्यार्थ्यांनीही त्याला खेळीमेळीच्या वातावरणात उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. अचूक उत्तर मिळाल्यावर शाबासकी द्यायलाही मुंढे सर विसरले नाहीत.