मला आव्हाने स्वीकारण्यास आवडतात
By Admin | Updated: June 29, 2016 03:38 IST2016-06-29T03:38:09+5:302016-06-29T03:38:09+5:30
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मी खूप उत्साहित असून, या दौऱ्यात उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणताही दबाव नाही.

मला आव्हाने स्वीकारण्यास आवडतात
मुंबई : आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मी खूप उत्साहित असून, या दौऱ्यात उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणताही दबाव नाही. मला आव्हान स्वीकारण्यास आवडतं आणि त्यामुळे ही माझ्यासाठी नवी संधी आहे, असा आत्मविश्वास भारताचा उपकर्णधार आणि भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले.
शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान रहाणेने आपल्या तयारीविषयी सांगितले. विंडीज दौऱ्याविषयी रहाणे म्हणाला की, ‘‘हा माझा दुसरा विंडीज दौरा असून, याआधी मी भारत ‘अ’ संघातून तेथे खेळलो होतो. मात्र
आता सिनियर संघातून विंडीज दौऱ्यावर जात असून, मी पूर्णपणे सज्ज आहे. या दौऱ्यासाठी खडतर सराव केला आहे. हा दौरा निश्चित आव्हानात्मक आहे; कारण विंडीज
संघ कडवी टक्कर देण्याची क्षमता राखून आहे.’’
उपकर्णधारपदाच्या जबाबदारीविषयी रहाणे म्हणाला, ‘‘या दौऱ्यासाठी मला उपकर्णधार म्हणून खूप चांगली जबाबदारी मिळाली आहे. मला आव्हानाला सामोरे जाऊन जबाबदारी पूर्ण करायला आवडते. उपकर्णधार
म्हणून माझ्यावर कोणताही
दबाव नाही. गतवर्षीचा झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये मी कर्णधार म्हणून खूप काही शिकलो.’’
त्याचप्रमाणे, ‘‘प्रत्येक दौरा आव्हानात्मक असतो. प्रत्येक देशात वेगवेगळे आव्हान असते. या सर्वांना सामोरे जाऊन तुम्ही कसे यशस्वी होता, हे महत्त्वाचे असते. उच्च स्तरावर जाण्यासाठी प्रत्येक आव्हान पेलण्याची क्षमता राखून ठेवणे गरजेचे असते,’’ असेही रहाणेने या वेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
>माझे वडील सुपरहिरो...
शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी रहाणेला ‘तुझा आवडता सुपरहिरो कोण?’ असा प्रश्न केला. यावर रहाणे म्हणाला, ‘‘माझे वडील माझे आवडते सुपरहिरो आहेत. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले असून, त्यांच्यामुळे मी शिक्षण पूर्ण करू शकतो. खेळासोबतच शिक्षणही खूप महत्त्वाचं असतं हे मला त्यांनी शिकवलं.’’
या वेळी विद्यार्थ्यांनी रहाणेला तुझे आवडते विषय कोणते होते? असाही प्रश्न केला. यावर रहाणेने, ‘इतिहास आणि गणित माझे आवडते विषय होते. मी गणितात ठीकठाक होतो, पण इतिहास खूप आवडायचा. मला विविध विषयांवरील पुस्तकेही वाचायला आवडतात,’ असे सांगितले. तसेच शाळेत मी नेहमी फर्स्ट बेंचर होतो, असेही रहाणेने आवर्जून सांगितले.