मुंबई - पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी म्हणजे श्री विठ्ठल-रुक्मिणीचा आषाढी यात्रासोहळा 12 जुलैला होणार आहे. या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखींची पाऊले पंढरीकडे येत आहेत. या पालख्यांसह शेकडो दिंड्या घेऊन लाखो वारकरी विठु-माऊलीच्या भेटीची आस घेऊन पंढरपुरला रवाना झाले आहेत. या वारकऱ्यांच्या दिंड्यामध्ये मीडियाच्या प्रतिनिधींपासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत, राजकारण्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. तर अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, संघटना, स्थानिक ग्रुपच्या माध्यमांतून वारकऱ्यांची सेवा केली जाते.
पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या सजावटीला सुरुवात करण्यात येते. त्यानुसार पुण्यात लाईट डेकोरेशनचा व्यवसाय करणारे नेरे (ता. मुळशी, जि. पुणे) येथील विनोद जाधव यांनी मंदिराची मोफत विद्युत रोषणाई केली आहे. तर कित्येक, सेवाभावी संस्थाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे सरसावतात. मात्र, याच वारकऱ्याच्या सेवेसाठी वारीत दाखल झालेल्या अब्दुल रज्जाक यांची कथाच वेगळी आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अब्दुल रज्जाक हे चक्क हैदराबादहून पुण्याला येतात. विशेष म्हणजे गेली 15 वर्षे ते वारीत दाखल होऊन वारकऱ्यांची सेवा करत आहेत. चालून चालून पाऊले दमलेल्यांचे पाय दाबणे, हात दाबणे, हाता-पायची मसाज करण्याचं मोठं काम अब्दुल रज्जाक करतात. त्यासाठी वारकऱ्यांकडून एकही रुपया घेतला जात नाही. याउलट आपल्याकडीलच औषधी वनस्पती आणि आयुर्वैदिक तेलाचा वापर ते करतात.
हिंदू-मुस्लीम भेद करणारे कुज्या मनाचे
हिंदू-मुस्लीम तणावाबाबत बोलताना अब्दुल यांचे विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत. तो विषय म्हणजे प्रत्येकाचे आपले वैयक्तिक मत आहे, आपण त्याचा विचार करायचा नाही. सर्वजण एकच आहेत, सर्वांचं रक्त एकच आहे. देवाने आपल्यात काहीही फरक केला नाही, काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी मुद्दामहून हा फरक करतात. सर्वांनी मिळून मिसळून राहावं, एकदिलाने राहावं त्यातच खरा आनंद आहे. जे असा दुजाभाव करतात, ती कुज्या मनाची माणसं असतात. आपण जेवढं मोठं मन करू, तेवढं आपला फायदा आहे, असे म्हणत एखाद्या मोठ्या तत्वज्ञानी माणसापेक्षाही सहज अन् सरळ तत्वज्ञान अब्दुल रज्जाक यांनी पटवून दिलंय.