हैदराबादी तरुणांनी केली नागपूरची रेकी
By Admin | Updated: December 27, 2015 00:43 IST2015-12-27T00:43:26+5:302015-12-27T00:43:26+5:30
इसिसच्या वाटेवर असलेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख हे तिघे इसिसच्या सूत्रधारांना ‘नागपूरची रेकी’ भेट देणार होते, अशी शंका उत्पन्न

हैदराबादी तरुणांनी केली नागपूरची रेकी
- नरेश डोंगरे, नागपूर
इसिसच्या वाटेवर असलेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख हे तिघे इसिसच्या सूत्रधारांना ‘नागपूरची रेकी’ भेट देणार होते, अशी शंका उत्पन्न करणारा घटनाक्रम प्राथमिक चौकशीतून उघड झाला आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
नागपूर ते श्रीनगर, तेथून पाकिस्तान आणि त्यानंतर सिरिया गाठण्याच्या तयारीत असलेल्या या तिघांनी सुमारे १३ तास नागपुरात घालवले. पकडले गेल्यानंतर त्यांनी नागपुरातील वास्तव्यादरम्यानचा घटनाक्रम उघड केला. तिघेही विसंगत अन् लपवाछपवी करीत माहिती देत होते.
हैदराबादहून गुरुवारी रात्री टॅक्सीने निघालेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख शुक्रवारी दुपारी १.३० वाजता नागपुरात पोहचले. आल्याआल्याच त्यांनी सीताबर्डीत जेवण घेतले. नंतर किरकोळ खरेदी केल्यानंतर दुपारी ३ ते ६ दिलवाले हा चित्रपट बघितला. त्यानंतर शहरातील विविध भागात फिरून अनेक संवेदनशील स्थळांची पाहाणी केली. कपडे, सुकामेवा आणि अन्य काही चिजवस्तू खरेदी केल्या.
रात्री ९ ते १२ असा पुन्हा
एक इंग्रजी सिनेमा बघितला.
त्यानंतर रेल्वेस्थानक गाठून जेवण
वगैरे केल्यानंतर त्या परिसरात
फेरफटका मारला. पूर्ण वेळ ते
खासगी वाहनाने फिरत होते. पहाटे ३ सुमारास ते विमानतळावर पोहचले.
स्वत:च्या घरीच केली चोरी
सिरियाला जाण्यासाठी माज याने स्वत:च्या आई-वडिलांच्या लॉकरमधील ९० हजार रुपये चोरले. मोबाइल ट्रॅकिंगवरून आपला माग काढला जाऊ शकतो, हे ध्यानात घेत त्यांनी आपले मोबाइल स्विच आॅफ करून रस्त्यात फेकून दिले होते.
संघ मुख्यालय, रेल्वेस्थानकाची रेकी
नागपुरातील सुमारे १३ ते १४ तासांच्या मुक्कामात या तिघांनी सीताबर्डीतील मॉल, विधानभवन, संघ मुख्यालय, रेल्वेस्थानकासह अनेक संवेदनशील स्थळांची रेकी केल्याचा संशय असून, ही सर्व माहिती ते श्रीनगरमध्ये पोहचल्यानंतर इसिसच्या म्होरक्यांना देणार होते, असाही संशय आहे. सीआयटी आणि एटीएसने ही बाब अधोरेखित केली. मात्र, याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. तथापि, या गंभीर प्रकाराची चौकशी केली जात असल्याचे खास सूत्रांचे सांगणे आहे.
श्रीनगरात ‘आका’
आपण श्रीनगरला पोहोचल्यानंतर तेथे आपले भव्य स्वागत होणार होते. तेथून पुढची सर्व व्यवस्था ‘आका’च करणार होते, असे या दोघांनी प्राथमिक चौकशीत सांगितल्याची माहिती आहे. श्रीनगरातील स्वागतकर्ते अन् ‘आका‘, इसिसचे सदस्य असल्याचा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी काढला आहे.