हुजूरमियाँनी दिला लाडक्या बाप्पांना निरोप
By Admin | Updated: September 3, 2014 01:07 IST2014-09-03T01:07:13+5:302014-09-03T01:07:13+5:30
सर्वाच्या घरी गणपती येतो, मग आपल्या घरीच का येत नाही. या लहान मुलाच्या हट्टापायी त्यांनी आपल्या घरात चार वर्षापूर्वी गणरायांना आणले.

हुजूरमियाँनी दिला लाडक्या बाप्पांना निरोप
पुणो : सर्वाच्या घरी गणपती येतो, मग आपल्या घरीच का येत नाही. या लहान मुलाच्या हट्टापायी त्यांनी आपल्या घरात चार वर्षापूर्वी गणरायांना आणले. त्यांचे नाव हुजूरमियॉँ इनामदार आहे. त्यांच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. आज त्यांनी बाप्पांना निरोप दिला. मुस्लिम कुटुंबाच्या या गणोशभक्तीचे कौतुक परिसरातील नागरिक करीत आहेत.
इनामदार धनकवडी येथील शांतीनगरमधील संभाजीनगरात राहतात. त्यांच्याकडे चार वर्षापासून गणरायांचे आगमन होते. ते दररोज सकाळ-संध्याकाळी आरती करतात. त्यांच्याकडे आजूबाजूचे नागरिकही आरतीसाठी येतात. इनामदार हे एका रुग्णवाहिकांचा व्यवसाय करतात. समीर इनामदार हा सध्या अकरावीत शिकत आहे. तो सातवीत असताना सगळीकडे गणरायांचे आगमन होताना पाहायचा. परंतु, आपल्या घरीच गणराय का येत नाहीत? असा प्रश्न त्याच्या मनात यायचा. तेव्हा
त्याने आपल्या वडिलांना याबाबत विचारले.
वडिलांनी मुलाचा हा हट्ट लगेच पुरविला व तेव्हापासून त्यांच्या घरात गणरायाचे आगमन झाले. त्यांची मुलगी करिष्मा ही बाप्पांची दररोज आरती करते. दर वर्षी ते नित्यनेमाने गणरायांची प्रतिष्ठापना करतात व पाच दिवसांनंतर निरोप देतात. (प्रतिनिधी)
मंगलमय वातावरण
घरामध्ये गणराय आल्यानंतर मंगलमय वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे एकप्रकारचा
उत्साह मनात रूजतो, अशा
भावना हुजूरमियॉँ इनामदार यांनी व्यक्त केल्या.