झोपडीदादाचा धुमाकूळ
By Admin | Updated: April 8, 2015 02:31 IST2015-04-08T02:31:33+5:302015-04-08T02:31:33+5:30
मानखुर्दच्या मोहिते-पाटील नगरात अवैध बांधकाम पाडण्यास गेलेल्या पालिका व पोलीस अधिकाऱ्यांवर राजेंद्र पाटोळे या भाजपाच्या पदाधिकाऱ्याने दगडफेक केली

झोपडीदादाचा धुमाकूळ
मुंबई : मानखुर्दच्या मोहिते-पाटील नगरात अवैध बांधकाम पाडण्यास गेलेल्या पालिका व पोलीस अधिकाऱ्यांवर राजेंद्र पाटोळे या भाजपाच्या पदाधिकाऱ्याने दगडफेक केली, एका अधिकाऱ्याची कॉलर पकडली, अधिकारी महिलेला शिवीगाळ केली, पोलीस निरीक्षकावर उकळते तेलदेखील भिरकावले. त्यामुळे एक सुसंस्कृत भारतीय पक्ष या भाजपाच्या आयडेंटिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालिका, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटोळे हा मोहिते-पाटील नगरातील झोपडीदादा असून, त्याला मानखुर्द पोलिसांनी गजाआड केले आहे. पाटोळे हा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा उपाध्यक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहिते-पाटील नगरातील अवैध बांधकामांची माहिती मिळताच एम-पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मागितला. बंदोबस्त मिळाल्यानंतर सोमवारी पालिका अधिकारी तेथे दाखल झाले. फौजफाटा पाहताच पाटोळेने भाजपा कार्यकर्ते, साथीदारांना गोळा केले. अधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रोखून एका अभियंत्याची कॉलर पकडून पाटोळेने धमक्या दिल्या. अधिकारी महिलेला अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर पाटोळेच्या इशाऱ्यावरून त्याच्या साथीदारांनी पोलीस, पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. या गडबडीत एका वडापावच्या गाडीवरील उकळत्या तेलाची कढई एका दंगेखोराने पोलीस निरीक्षकाच्या दिशेने भिरकावली. या हल्ल्यातून संबंधित निरीक्षक थोडक्यात बचावला.
हा प्रकार साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून जर ही कारवाई रोखण्यात आली तर या झोपडीदादांची, दंगेखोरांची हिंमत आणखी वाढेल, हा विचार पुढे आला आणि त्या परिस्थितीत कारवाई करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पालिका अधिकाऱ्यांनी मोहिते-पाटील नगरातली अवैध बांधकामे तोडली.