हुश्श... मान्सून केरळात दाखल

By Admin | Updated: June 6, 2015 02:21 IST2015-06-06T02:21:03+5:302015-06-06T02:21:03+5:30

काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे पाच दिवसांपासून अरबी समुद्रात अडकून पडल्याने हुलकावणी देणारा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अखेर शुक्रवारी केरळमार्गे देशात दाखल झाला.

Hushh ... Monsoon is thrown in Kerala | हुश्श... मान्सून केरळात दाखल

हुश्श... मान्सून केरळात दाखल

‘पेरते व्हा’ची खूशखबर : पाच दिवस विलंबाने ‘नभ उतरू आले’
पुणे /मुंबई : काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे पाच दिवसांपासून अरबी समुद्रात अडकून पडल्याने हुलकावणी देणारा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अखेर शुक्रवारी केरळमार्गे देशात दाखल झाला. मान्सूनने केरळबरोबर तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा काही भाग आणि संपूर्ण लक्षद्वीप बेटांवर तसेच बंगालच्या उपसागरातही जोरदार हजेरी लावली. महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व पावसाने नगर, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली या भागांत हजेरी लावली़ किंचितशा विलंबाने का होईना नभ उतरू आल्याने आणि अनेक ठिकाणी पहिल्या पावसाने दरवळलेल्या मातीच्या अनमोल गंधाने ‘पेरते व्हा’ची खूषखबर बळीराजापर्यंत पोहोचविली आहे.
यंदा मॉन्सून वेळेआधी दाखल होणार, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानुसार नेहमीपेक्षा चार दिवस आधी १६ मे रोजी मॉन्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखलही झाला. त्यानंतर तो नियोजित तारखेआधी म्हणजेच १ जूनऐवजी ३१ मे रोजीच केरळमार्गे देशात दाखल होईल, असा अंदाज होता. त्यानुसार मॉन्सून आगेकूच करीत अरबी समुद्र आणि श्रीलंकेत पोहोचला. अरबी समुद्रात हवेचा अधिक दाब निर्माण झाल्याने तो तेथेच अकडून पडला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी लक्षद्वीप बेटांजवळ हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि तो काल तीव्र झाला. त्यामुळे या भागात आणि केरळमध्ये जोरदार पावसास सुरूवात झाली. संपूर्ण केरळसह अर्ध्याहून अधिक तामिळनाडू आणि कर्नाटक राज्याचा दक्षिणचा काही भाग मॉन्सूनने व्यापला.

कोल्हापूर जिल्ह्णात गुरुवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तब्बल तासभर पाऊस झाला़ अहमदनगर जिल्ह्णात पावसाने शुक्रवारी पहाटे हजेरी लावली़ पारनेर तालुक्यातील सुपा तर, श्रीगोंदामधील देवदैठणमध्ये अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्णात सरासरी ६ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ पारनेर तालुक्यातील सुपा आणि श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठणमध्ये अतिवृष्टी, तर नगर, कर्जत आणि राहुरी, पारनेर, श्रीगोंदा येथे रिमझिम पाऊस झाला़

मान्सूनच्या प्रवासासाठीचे वातावरण अनुकूल
मान्सूनच्या पुढील प्रवासादरम्यान अडथळे आले नाहीत तर १० जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होईल; आणि १२ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होईल.
- शुभांगी भुते (संचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते)

केरळमध्ये २ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी त्याची तीव्रता वाढल्याने मान्सून दाखल झाल्याचे आम्ही जाहीर केले. पुढील ४८ तासांत मान्सून आणखी पुढे सरकेल आणि अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरचा आणखी काही भाग व्यापेल. त्याचबरोबर तो ईशान्य भारतातही दाखल होईल.
- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

Web Title: Hushh ... Monsoon is thrown in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.