पत्नीकडून होतोय पतिराजांचा छळ!

By Admin | Updated: March 2, 2015 23:16 IST2015-03-02T23:16:57+5:302015-03-02T23:16:57+5:30

ऐकावं ते नवलच : पोलीस ठाण्याच्या कौटुंबिक विशेष कक्षात सत्तर तक्रारी, पतींना शारीरिक आणि मानसिक त्रास

Husband's wife is tortured! | पत्नीकडून होतोय पतिराजांचा छळ!

पत्नीकडून होतोय पतिराजांचा छळ!

संजय पाटील - कऱ्हाड  -पती-पत्नीमधील वाद जोपर्यंत चार भिंतीत असतो तोपर्यंत घराला घरपण असतं. मात्र, हाच वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला तर कुटुंबाची वाताहत सुरू होते. आजपर्यंत असे अनेक वाद पोलीस ठाण्यात गेलेत. पतीने शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रारही पत्नींनी केलीय; पण आता चक्क ‘पत्नी छळतेय’ म्हणून पतीच पोलीस ठाण्यात जाऊ लागलेत. कऱ्हाडमध्ये दीड वर्षात तब्बल सत्तर पतिराजांनी अशी तक्रार केल्याचं समोर येतंय.
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात कौटुंबिक वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी ‘कौटुंबिक विशेष कक्ष’ कार्यरत आहे. पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या कौटुंबिक तक्रारी सुरुवातीला या कक्षाकडे वर्ग केल्या जातात. तेथे समुपदेशकांकडून तक्रारदार व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे समुपदेशन केले जाते. त्यातून तुटण्याच्या मार्गावर असलेली नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जातो.
शहर पोलीस ठाण्यातील या कक्षाकडे दाखल होणाऱ्या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी पती-पत्नीमधील वादाच्या असतात. साधारणपणे पती छळ करीत असल्याचीच बहुतांश महिलांची तक्रार असते; पण गेल्या वर्षभरापासून पत्नी छळतेय, अशी तक्रार घेऊन काही पती या कक्षापर्यंत पोहोचलेत. पत्नी माझ्याकडे दुर्लक्ष करते, माझं ऐकत नाही, सासू-सासऱ्यांशी जमवून घेत नाही, हेकेखोरपणे वागते, वारंवार वाद घालते, असंच काहीसं पतिराजांचं म्हणणं आहे. कधी-कधी पत्नीने हात उगारल्याची तक्रारही पतीने केली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या तक्रारींचे प्रमाण धक्कादायक आहे.
वास्तविक, वेगवेगळ्या कारणास्तव पतीकडून पत्नीला मिळणारी अपमानास्पद वागणूक व होणारा शारीरिक, मानसिक छळ नवीन नाही; पण पत्नी छळ करीत असल्याची तक्रार ज्यावेळी कौटुंबिक विशेष कक्षापर्यंत पोहोचली त्यावेळी तेथील समुपदेशकही विचारात पडले. आजही समाजात काही अंशी का होईना, पुरुषप्रधान संस्कृती असल्याचे सांगितले जाते. असे असताना पत्नीकडून छळ होतोय म्हणून पतींनी ओरड करावी, हेच न पटण्यासारखे होते. त्यामुळे समुपदेशकांनी कक्षात अशी तक्रार घेऊन येणाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पत्नीकडून कशा पद्धतीने छळ होतो, याची माहिती त्यांनी घेतली. तक्रारदार पतींनी ज्यावेळी पत्नीकडून होणाऱ्या छळाची कहाणी समुपदेशकांना सांगितली त्यावेळी समुपदेशकही चकित झाले. छळाची वेगवेगळी आणि थक्क करणारी कारणे ऐकून समुपदेशकही बुचकळ्यात पडलेत. कुणाची घालायची, हा प्रश्न असताना तक्रारींची संख्या वाढतच आहे.


अनेक पतींना अश्रू अनावर
‘पत्नीने आतापर्यंत अनेकवेळा माझ्याविरोधात नातेवाइकांकडे तक्रार केली आहे. मी काहीही केलं नसलं तरी तिचा तक्रारीचा पाढा कमी होत नाही. छोट्या-छोट्या गोष्टी ती तिच्या आई-वडिलांना सांगते. आमच्या संसारात त्यांचा हस्तक्षेप होतो. एक-दोन वेळा तिने पोलीस ठाण्यातही माझ्याविरोधात तक्रार दिली. हे सगळं सहन होत नाही,’ असे म्हणत काही पतींनी कक्षामध्ये अश्रू ढाळलेत, अशी माहिती समुपदेशक सुनीता साठे यांनी दिली.


न सांगता माहेरी जाते!
पत्नीविरोधात तक्रार करताना बहुतांश पती आपल्या पत्नीच्या वारंवार माहेरी जाण्यावर आक्षेप घेतात. मी कामावर गेलो की मागोमाग न सांगता ती माहेरी निघून जाते. परत बोलवलं तर काहीही कारण सांगून ती येणं टाळते, असं ‘त्या’ पतींचं म्हणणं आहे.


कृतीतून राग दाखवते!
पती-पत्नीमध्ये वाद होणारच; पण वाद झाला तर तो कृतीतून दाखविण्यात काय अर्थ ? असा प्रश्नच काही पतींकडून उपस्थित केला जातो. वाद झाला की ती आदळआपट करते. विनाकारण चिडचीड करते. तिच्या अशा वागण्याने माझी घुसमट होते, असंही काही पतींनी समुपदेशकांना सांगितलं आहे.

तोंड दाबून, बुक्क्यांचा मार!
कौटुंबिक विशेष कक्षाकडे तक्रारी करणाऱ्या पतींकडे ज्यावेळी समुपदेशक चौकशी करतात त्यावेळी त्यांच्याकडून सर्व प्रश्नांच एकाच वाक्यात उत्तर दिलं जातं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय, एवढंच बहुतांश पतींकडून सांगितलं जातं. ..

पती आणि पत्नीमध्ये वाद होणं स्वाभाविक आहे; पण हा वाद टोकाला जाऊ नये, याची खबरदारी दोघांनीही घ्यायला हवी. दोघांचा संसार सुखाचा व्हावा, यामध्ये कुटुंबीयांची भूमिकाही महत्त्वाची आहे. कुटुंबीयांनी वेळोवेळी दोघांची समजूत घातली तर असे वाद पोलीस ठाण्यापर्यंत येणारच नाहीत.
- सविता खवळे, समुपदेशक,
कौटुंबिक विशेष कक्ष


कौटुंबिक कक्षाकडे १७३ तक्रारी
गेल्या दीड वर्षात पती किंवा पत्नीकडून होणाऱ्या शारीरिक, मानसिक छळाच्या एकूण १७३ तक्रारी कौटुंबिक विशेष कक्षाकडे दाखल झाल्या आहेत. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या एक वर्षाच्या कालावधीत ८७ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये पत्नीने पतीविरोधात दिलेल्या तक्रारींची संख्या ४७ तर पतीने पत्नीविरोधात दिलेल्या तक्रारींची संख्या ४० आहे. एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत दाखल झालेल्या एकूण २६ तक्रारींपैकी पतीविरोधात १० तर पत्नीविरोधात दाखल झालेल्या तक्रारींची संख्या १६ आहे. आॅक्टोबर २०१४ ते जानेवारी २०१५ अखेर ६० तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये पत्नीने पतीविरोधात केलेल्या तक्रारींची संख्या ४५ तर पतीने पत्नीविरोधात केलेल्या तक्रारींची संख्या १५ आहे.

Web Title: Husband's wife is tortured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.