पतीला घर सोडण्याचा आदेश
By Admin | Updated: July 20, 2016 00:34 IST2016-07-20T00:34:47+5:302016-07-20T00:34:47+5:30
कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या दाव्यात सुनावणी पूर्ण होईपर्यंत पतीला घर सोडण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला

पतीला घर सोडण्याचा आदेश
पुणे : कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या दाव्यात सुनावणी पूर्ण होईपर्यंत पतीला घर सोडण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांवर अनेकदा घर सोडण्याची वेळ येते. मात्र, कायद्याने त्या घरात राहू शकतात. कोर्टात दावा दाखल असेल तर पतीवरच घर सोडण्याची वेळ येऊ शकते, हे या निकालाने स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे या केसमध्ये पत्नीने घर घेताना पतीपेक्षा तिप्पट रक्कम दिली होती. तसेच घर सोडावे लागल्यानंतरही ती घराचे हप्ते भरत होती. मात्र न्यायालयाच्या या निकालामुळे तिला दिलासा मिळाला. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर यांनी नुकताच हा निकाल दिला.
याप्रकरणी अर्जदार महिलेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता. कोथरूड परिसरात उषा यांनी फ्लॅट घेतला होता. फ्लॅट घेताना त्यांनी पतीपेक्षा तिप्पट पैसे दिले होते. अर्जदार महिलेचा पती तिला सतत त्रास देत असे. त्यामुळे तिच्यावर घर सोडण्याची वेळ आली होती. त्याच्याकडून झालेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत दावा दाखल केला होता.
संबंधित महिलेची केस समुपदेशकांकडे पाठविण्यात आली होती. मात्र समुपदेशकांनी प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही.
त्यामुळे या केसची सुनावणी पूर्ण झाली. कोर्टाने या केसचा निकाल देताना अर्जदार महिलेला घरात
राहू देण्यात यावे. तसेच पतीने
त्यांचे राहते घर या खटल्याचा
निकाल पूर्ण होईपर्यंत सोडावे, असा आदेश दिला. (प्रतिनिधी)