शिकार बेतली जीवावर
By Admin | Updated: May 29, 2015 01:17 IST2015-05-29T01:17:47+5:302015-05-29T01:17:47+5:30
आंबे-काजू काढण्यासाठी गेलेले सात-आठ तरुण जंगलात साळींदर दिसताच त्याची शिकार करण्यासाठी ते त्याच्या मागे लागले. साळींदर एका गुहेत शिरला.

शिकार बेतली जीवावर
देवरुख (जि. रत्नागिरी) : आंबे-काजू काढण्यासाठी गेलेले सात-आठ तरुण जंगलात साळींदर दिसताच त्याची शिकार करण्यासाठी ते त्याच्या मागे लागले. साळींदर एका गुहेत शिरला. त्याच्या पाठोपाठ गुहेत गेलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू
झाला. ही घटना गुरुवारी
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी-खांबेवाडी येथे घडली. त्यातील
एकाने तर यंदाच दहावीची परीक्षा दिली आहे.
पंकेश प्रकाश खापरे (१५), विकास भिवा मांडवकर (३०),
विलास बाळू पाताडे (३५) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांसह सात ते आठजण बुधवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास भिरकोंड येथे आंबा, काजू काढण्यासाठी गेले होते. आंबे काढता काढता त्यांना तेथे साळिंदर दिसला. या साळिंंदरला मारण्यासाठी सर्वांनी त्याचा पाठलाग केला. खांबेवाडी येथे साळिंदर एका भुयारामध्ये घुसले. त्याला मारण्याचा चंग या तरुणांनी बांधला. साळींदर बाहेर येईल म्हणून सर्वजण रात्रभर भुयाराबाहेर वाट पाहत होते. गुरुवारी पहाटेपर्यंत साळिंदर बाहेर न आल्याने या तरुणांनी भुयारामध्ये जाण्याचे ठरविले.
गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पंकेश खापरे भुयारामध्ये घुसला. बराचवेळ पंकेश बाहेर न आल्याने विकास मांडवकर आत गेला. मात्र, तोही परत न आल्याने विलास पाताडे भुयारामध्ये शिरला. बराचवेळ तिघेही बाहेर न आल्याने अन्य तरुणांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी गावात जाऊन हा प्रकार ग्रामस्थांसमोर कथन केला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली. नंतर तिघांना बाहेर काढून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा गुदमरून
मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर
केले. (प्रतिनिधी)