उपासमार, गोंधळाच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू

By Admin | Updated: January 3, 2015 01:29 IST2015-01-03T01:29:39+5:302015-01-03T01:29:39+5:30

कोल्हापूर येथे जेरबंद केलेल्या बिबट्याचा चांदोली अभयारण्यात नेताना गुरुवारी मृत्यू झाला होता.

Hunger, death of leopard in a chaos | उपासमार, गोंधळाच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू

उपासमार, गोंधळाच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू

शिराळा : कोल्हापूर येथे जेरबंद केलेल्या बिबट्याचा चांदोली अभयारण्यात नेताना गुरुवारी मृत्यू झाला होता. तीन-चार दिवसांपासून उपाशी असल्याने आणि नागरिकांनी केलेल्या गोंधळाचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला असण्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालात काढण्यात आला आहे.
गुरुवारी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी नेत असताना, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. वनक्षेत्रपाल भरत माने यांनी त्याला तपासले असता, तो मृत झाल्याचे निदर्शनास आले.
डॉ. सुहास देशपांडे यांनी चांदोली अभयारण्यातील झोळंबीजवळ असणाऱ्या जनीचा आंबा येथे त्याचे विच्छेदन केले. बिबट्या दोन-चार दिवस उपाशी होता.
शिवाय त्याला पकडताना नागरिकांनी खूप गोंधळ केला. उपासमार आणि
गोंधळामुळे बिबट्याची हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याचे डॉ. देशपांडे यांनी शवविच्छेदन अहवालात
म्हटले आहे. शवविच्छेदनाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर जनीचा आंबा येथे चांदोली राष्ट्रीय उद्यानातच बिबट्याचे दहन करण्यात आले. (वार्ताहर)

अशा प्रकारे बिबट्याचा मृत्यू होण्याची चांदोलीतील ही दुसरी घटना आहे. गतवर्षी १४ सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील आपनीमेटा येथून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी आणलेल्या पाच ते साडेपाच वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

Web Title: Hunger, death of leopard in a chaos