स्वतंत्र विदर्भासाठी मानवी साखळी
By Admin | Updated: August 17, 2014 00:43 IST2014-08-17T00:43:08+5:302014-08-17T00:43:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २१ आॅगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने मानवी साखळीद्वारे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे त्यांचे लक्ष

स्वतंत्र विदर्भासाठी मानवी साखळी
पंतप्रधानांचे वेधणार लक्ष : आश्वासन पाळण्याची करणार विनंती
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २१ आॅगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने मानवी साखळीद्वारे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे त्यांचे लक्ष वेधून भाजपने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी विनंती करण्यात येणार आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक गिरीपेठ येथील मुख्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. भाजपाने भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मंजूर केला होता. तसेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सुद्धा सत्तेत आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २१ तारखेला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. तेव्हा त्यांना आपल्या आश्वासनाची आठवण करून देण्याच्या उद्देशाने उपरोक्त आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान राजभवन ते कस्तूरचंद पार्क या रस्त्याने जातील तेव्हा रस्त्याच्या बाजूने मानवी साखळी तयार करण्यात येईल. या कार्यकर्त्यांच्या छातीवर ५०० फूट लांबीचे अखंड बॅनर असेल. त्या बॅनरवर भाजपाच्या जाहीरनाम्यातील छोट्या राज्याचा उल्लेख असेल. भुवनेश्वर येथील ठरावाचा उल्लेख आणि गडकरींनी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख असेल. या मानवी साखळीसाठी १८ ते २० या दरम्यान नागपूर शहरात पदयात्रा काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येईल.
तसेच ‘विदर्भ मिळवू औंदा’ या स्लोगनसह ‘आंदोलन विदर्भाचे’ या बॅनरखाली विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे यापुढील विदर्भ राज्याचे आंदोलन करण्यात येईल, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच प्रत्येक पक्षाच्या नेत्याला जनतेने विदर्भासंबंधात जाहीर सभेत प्रश्न विचारावे, असे आवाहन करण्यात आले.
राम नेवले यांनी प्रास्ताविक केले. दिलीप नरवडिया यांनी संचालन केले. सभेला अॅड. वामनराव चटप, दीपक निलावार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धनंजय धार्मिक, अरुण केदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)