ह्युज रिस्क..

By Admin | Updated: December 1, 2014 00:55 IST2014-12-01T00:55:19+5:302014-12-01T00:55:19+5:30

नियतीच्या मनात काय आहे, हे कुणालाच कळत नाही... म्हणून कुणी जगणे सोडून देतो का...नाही नक्कीच नाही. आॅस्ट्रेलियन फलंदाज ह्युज याला असा अकाली आलेला मृत्यू मनाला चटका लावून गेला हे खरे आहे.

Huge Risk .. | ह्युज रिस्क..

ह्युज रिस्क..

खेळताना जरा संभाळूनच : पालक धास्तावले
नागपूर : नियतीच्या मनात काय आहे, हे कुणालाच कळत नाही... म्हणून कुणी जगणे सोडून देतो का...नाही नक्कीच नाही. आॅस्ट्रेलियन फलंदाज ह्युज याला असा अकाली आलेला मृत्यू मनाला चटका लावून गेला हे खरे आहे. परंतु त्यामुळे क्रिकेट हा खेळच वाईट आहे, असे कुणी म्हणत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही. क्रिकेट हा जंटलमन लोकांचा खेळ आहे आणि तो जंटलमनसारखाच खेळला गेला पाहिजे़ कुठलाही जंटलमन अपघाताच्या भीतीने डाव अर्ध्यावर सोडत नाही़ स्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शो मस्ट गो आॅन हाच खेळाडूचा नारा असला पाहिजे़ ह्युजच्या अपघाती मृत्यूमुळे जगभरातील क्रिकेट विश्वात जे भीती व संभ्रमाचे वातावरण आहे ते निवळावे व या खेळाकडे पूर्वीइतकेच विश्वासाने पाहिले जावे, यासाठी लिखाणाचा हा सर्व प्रपंच आहे़
आॅस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर फलंदाज फिलिप ह्युज एबोटच्या बाऊन्सरवर जखमी झाला आणि त्याला जीव गमवावा लागला. ह्युजचे वयाच्या २५ व्या वर्षी क्रिकेट सामन्यादरम्यान अपघाती निधन झाल्यामुळे क्रिकेट विश्व हादरले आहे. मनाला चटका लावून जाणाऱ्या या घटनेची नागपूरच्या क्रिकेट वर्तुळातही मोठी चर्चा आहे. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे ह्युजच्या अपघाती मृत्यूच्या घटनेमुळे उदयोन्मुख खेळाडू, त्यांचे पालक व प्रशिक्षक दक्ष झाल्याचे चित्र दिसायला लागले आहे़ ह्युजबाबत घडलेली दुर्घटना क्रिकेटमध्ये काही प्रथमच घडली असे नाही तरी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. ‘जो डर गया, वो मर गया’ हा ‘शोले’तील गब्बरचा संवाद ८० च्या दशकातील क्रिकेटपटूंसाठी मनोधैर्य वाढविण्यास कारणीभूत ठरला होता़ आता काळ बदलला आहे़ आजच्या पिढीतील खेळाडूंनी ‘डर के आगे जित है’ याला यशाचा मूलमंत्र मानून मार्गक्रमण सुरू केले आहे़
आता मूळ मुद्दा आहे ह्युजचे हेल्मेट दर्जेदार होत की नव्हते हा़ २६ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या ह्युजला चेंडू लागू शकतो तर आपणही क्रिकेटच खेळतो. असा अपघात पुन्हा घडणार नाही, याची शाश्वती काय? यासाठी कुठली खबरदारी घेता येईल? असे एक ना अनेक प्रश्नांचे सध्या चर्वितचर्वण सुरू आहे. अनेक उदयोन्मुख खेळाडूंनी व त्यांच्या पालकांनी या अपघाताची धास्ती घेतली आहे. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, असे म्हटले जाते. पण आता हा खेळही जीवावर बेतू शकतो, याची प्रचिती आल्यानंतर पालक थोडे घाबरले आहेत. काहींनी मात्र याकडे केवळ अपघाताच्या दृष्टीने बघत करिअरसाठी क्रिकेटची केलेली निवड ‘फिक्स’ असल्याचे सांगितले आहे़ रस्त्यावरही अपघात होतात. त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरून चालणे सोडायचे काय? असा प्रतिप्रश्न करीत काही खेळाडूंनी हेल्मेटमध्ये सुधारणा करण्याची सूचना केली आहे. प्रशिक्षकांनी खेळाडूला गुणवत्ता असलेलेच साहित्य वापरण्याचा सल्ला देणे किती गरजेचे आहे, याची प्रचिती ह्युजबाबत घडलेल्या दुर्घटनेमुळे आली.
स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी खेळाडू आक्रमक झाले आहेत. तंत्रापेक्षा निकालावर लक्ष देणाऱ्या सध्याच्या काळातील खेळाडूंचा ‘अटॅक इज द बेस्ट डिफेन्स’ यावर अधिक विश्वास आहे. प्रशिक्षकही त्यांच्या मनावर तेच बिंबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे खेळाडू तंत्रापेक्षा धावा कशा वसूल करता येईल, याकडे लक्ष केंद्रित करीत असल्याचे दिसून येते. ह्युजबाबत घडलेल्या दुर्घटनेमुळे क्रिकेट विश्वाला नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे. याबाबत लोकमतच्या प्रतिनिधींनी शहरातील विविध क्लब, खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांसोबत चर्चा केली. क्रिकेट या खेळात ‘ह्युज रिस्क’ असली तरी खेळाडूंचा खेळण्याचा व त्यात करिअर करण्याचा निर्धार मात्र फिक्स असल्याचे दिसून येत असून पालक मात्र धास्तावलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा विशेष वृत्तांत. ( वाचा पान ७ वर)

Web Title: Huge Risk ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.