हृतिकचा 30 कोटींचा भूखंड अडकला चौकशीच्या फे-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 13:49 IST2017-05-29T12:46:57+5:302017-05-29T13:49:34+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन आणि त्यांचा मुलगा हृतिक रोशन यांनी खंडाळा येथे विकत घेतलेली जमीन चौकशीच्या फे-यात अडकली आहे.

Hrithik's plot worth Rs 30 crore has been canceled | हृतिकचा 30 कोटींचा भूखंड अडकला चौकशीच्या फे-यात

हृतिकचा 30 कोटींचा भूखंड अडकला चौकशीच्या फे-यात

 ऑनलाइन लोकमत 

लोणावळा, दि. 29 - बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन आणि त्यांचा मुलगा हृतिक रोशन यांनी खंडाळा येथे विकत घेतलेली जमीन चौकशीच्या फे-यात अडकली आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात रोशन कुटुंबाच्या सुंदर भवर हॉलिडे होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खंडाळा येथे जमीन विकत घेतली. रोशन यांच्या कंपनीने त्यांच्या मालकीच्या भूखंडाबरोबरच तिथल्या  सरकारी जमिनीचा काही भाग बळकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. यात दफनभूमीच्या जागेचाही समावेश आहे. 
 
किरण गायकवाड यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन हे प्रकरण समोर आणले. रोशन यांनी डिसेंबर महिन्यात 30 कोटी रुपयांना हा भूखंड विकत घेतला होता. 181 बी मावळ तालुका हा 504 चौरस मीटरचा भूखंड राज्य सरकारच्या मालकीचा आहे तसेच सर्वे नंबर 182 हा भूखंड दफनभूमीसाठी आरक्षित आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत जी माहिती मिळाली ती पाहून मला धक्का बसला हे दोन्ही भूखंड सध्या रोशन यांच्या कंपनीच्या ताब्यात आहेत असे किरण गायकवाड म्हणाले. रोशन यांच्या ताब्यातून ते भूखंड परत घ्यावेत यासाठी लोणावळा महापालिकेशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असे किरण गायकवाड यांनी सांगितले. 
 
राकेश आणि हृतिक रोशन यांनी यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या जागेची जबाबदारी असलेल्या शाकीर शेखने सुंदर भवर हॉलिडे होम्सने कोणतेही बेकायदा काम केले नसल्याचे सांगितले. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संरक्षक भिंत उभारली. आम्ही कुठलेही उल्लंघन केलेले नाही. आमच्या जमिनीमध्ये सरकारी भूखंड आले असतील तर, सरकारने का दावा केला नाही ? असा प्रश्न  शाकीर शेखने उपस्थित केला. 
 
कागदपत्रांवरुन समोर आलेल्या माहितीनुसार 19 डिसेंबर 2016 रोजी रोशन यांनी ही जमीन विकत घेतली. यावर्षी नऊ फेब्रुवारीला संरक्षक भिंत बांधायला लोणावळा महापालिकेने मंजुरी दिली. 3 एप्रिल 2017 रोजी एमएसआरडीसीने ना हरकत प्रमाणपत्र दिले. किरण गायकवाड यांनी जी कागदपत्रे समोर आणली आहेत त्याची आम्ही छाननी करु पण यावेळी यापेक्षा जास्त काही बोलता येणार नाही असे लोणावळा महापालिकेचे अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले. 
 

Web Title: Hrithik's plot worth Rs 30 crore has been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.