सिंचन क्षमता कशी वाढणार?
By Admin | Updated: December 8, 2014 00:57 IST2014-12-08T00:57:52+5:302014-12-08T00:57:52+5:30
जिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही.

सिंचन क्षमता कशी वाढणार?
तलावात गाळ साचला : जिल्ह्याला १५० कोटींची गरज
गणेश हूड - नागपूर
जिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही. गाळ काढण्याबाबतचे जाचक शासन निकष व निधीचा अभाव अशा परिस्थितीत सिंचन क्षमता कशी वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव, ५६ पाझर तलाव, ३९ गावतलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्यांची संख्या विचारात घेता जिल्ह्यातील सिंचन वाढण्याची अपेक्षा होती. परंतु तलाव व बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. साठवण क्षमता कमी झाल्याने त्यांचा सिंचनासाठी उपयोग होत नाही. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. परंतु तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारा निधी नाही.
मनरेगाच्या माध्यमातून गाळ काढावा, असे राज्य सरकारचे निर्देश आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या योजनेवर मजूर मिळत नसल्याने सिंचन विभाग हतबल आहे. तलावातील गाळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यातीलं असल्याने यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे.
प्रस्ताव प्रलंबित...
तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी १५० कोटींचा निधी द्यावा, असा प्रस्ताव जि.प.च्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने वर्षभरापूर्वी राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु तो प्रलंबित आहे. जिल्हा नियोजन समितीकडूनही मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
मजूर मिळत नाही
मनरेगा योजनेवरील मजुरांच्या माध्यमातून तलावातील गाळ काढावा, असे सरकारचे धोरण आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या योजनेवर मजूर मिळत नाही; तसेच यासाठी वेगळा निधी नसल्याने गाळ काढताना अडचणी आहेत. यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला तरच ते शक्य होईल, असे मत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश गिरी यांनी व्यक्त केले.