मराठी माणसात फूट पाडणारे विकास कसा करणार?
By Admin | Updated: October 10, 2014 03:01 IST2014-10-10T03:01:18+5:302014-10-10T03:01:18+5:30
स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्मितीतून तमाम मराठी मने एकत्र जोडली. शिवसेनेच्या मुळात मराठी माणसाचे साम्राज्य उभे केले.

मराठी माणसात फूट पाडणारे विकास कसा करणार?
कल्याण : स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्मितीतून तमाम मराठी मने एकत्र जोडली. शिवसेनेच्या मुळात मराठी माणसाचे साम्राज्य उभे केले. पण, त्यांच्या हयातीतच दोन भावंडांच्या सत्तेच्या भांडणात मराठी माणूस दुभंगला. ते राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास कसा साधणार, असा सवाल केंद्रीय परराष्ट्रमंत्री, भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी येथे केला.
गेली २५ वर्षे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती होती. या निवडणुकीत ही युती होऊ शकली नाही. भाजपा, भाजपा नेते आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध लक्षात घेता शिवसेनेवर टीका करणार नाही, असे धोरण भाजपाने जाहीर केले़ पण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली मर्यादा सोडून बोलत आहेत, वागत आहेत, असेही त्या ठाकरे यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता म्हणाल्या.
यशवंतराव चव्हाण मैदानात १२ वाजता सभेची वेळ जाहीर केली होती. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टरला दोन तास उशीर झाला. महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर अत्यंत कडक शब्दांत टीका करून स्वराज पुढे म्हणाल्या, पूर्वी जो महाराष्ट्र विकसित होता, इतर राज्ये त्याच्याकडे कौतुकाने पाहत़ मात्र, त्याच महाराष्ट्रात आघाडीच्या काळात शेतकरी, पोलीस आत्महत्या करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. भ्रष्टाचाराने तर महाराष्ट्रात कळस गाठला आहे. औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट झाली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे महाराष्ट्राचेच आहेत. तरीही महाराष्ट्रातील कृषीचा दर घटत आहे. परदेशांतून विकासासाठी साहाय्य आले, पण ते महाराष्ट्रात आलेच नाही, अशी अत्यंत कडवट टीका त्यांनी या वेळी तळपत्या उन्हातही केली. (वार्ताहर)