सहा कोटी खर्च कसे करणार ?
By Admin | Updated: February 2, 2015 01:12 IST2015-02-02T01:12:28+5:302015-02-02T01:12:28+5:30
जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेला अतिरिक्त विकास निधी खर्च करण्यास फक्त दोन महिन्याचा अवधी शिल्लक असल्याने, त्याचे नियोजन करताना आमदार आणि संबंधित सरकारी यंत्रणेवरही ताण आलेला आहे.

सहा कोटी खर्च कसे करणार ?
आमदारांचा अतिरिक्त विकास निधी : नियोजनासाठी फक्त दोन महिने
नागपूर : जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेला अतिरिक्त विकास निधी खर्च करण्यास फक्त दोन महिन्याचा अवधी शिल्लक असल्याने, त्याचे नियोजन करताना आमदार आणि संबंधित सरकारी यंत्रणेवरही ताण आलेला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदारांनी त्यांना मिळालेला दोन कोटी रुपयांचा विकास निधी पूर्ण खर्च केल्याने, नव्याने निवडून आलेल्या आमदारांसाठी विकास निधी शिल्लक नव्हता. त्यामुळे त्यांनी केलेल्या आग्रही मागणीचा विचार करून, शासनाने प्रत्येक आमदारासाठी विशेष बाब म्हणून जानेवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात ५० लाख रुपये मंजूर केले. नागपूर जिल्ह्यात १२ आमदार आहेत व त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये याप्रमाणे नागपूर जिल्ह्याला सहा कोटी रुपये प्राप्त होणार आहे. जिल्हा नियोजन विभागामार्फत प्रस्ताव पाठवून, हा निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजे मार्चपर्यंत खर्च करायचा आहे.
२०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तत्कालीन आमदारांनी त्यांच्या वाट्याच्या विकास निधीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे दिले व त्याची कामे अजून सुरूच आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांची तर काही ठिकाणी अद्याप कामेही सुरू झाली नाहीत.
आता नव्याने आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील ५० लाखांचे विविध कामांचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करणे सुरू केले आहे.
आता अतिरिक्त निधीचे प्रस्ताव सादर करणे, त्याला मंजुरी मिळणे, तो संबंधित विभागाकडे पाठविणे, निविदा काढून कामाचे कार्यादेश देणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, हे येथे उल्लेखनीय.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, असे शासनाकडून सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या मदत वाटपावरही निधीच्या तुटवड्यामुळे परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांना अतिरिक्त निधी देण्याची खरंच गरज होती काय? असाही सवाल शेतकरी नेते करीत आहेत. (प्रतिनिधी)