पंकज रोडेकर,ठाणे- सैन्य भरतीसाठी वारंवार प्रयत्न करूनही अपयश पाठ सोडत नव्हते. कुणी सात ते आठ तर कुणी तीन-चार वेळा प्रयत्न केले होते... नशीब कधी फळफळेल, याची शाश्वती नव्हती. त्यामुळेच वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही माजी सैनिकांची मुले सैन्य भरती घोटाळ्यात फसली... हे पाऊल उचलण्यापूर्वी एकदा जरी पालकांना विचारले असते, तर ही वेळ आली नसती, अशी भावनाही काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ कडे मांडली. ती मांडताना त्यांना अश्रु अनावर झाले होते.सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारीला लिपिक आणि ट्रेड्समनसह चार पदांसाठी देशभरात घेतलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पर्दाफाश केला. या घोटाळ्यात महाराष्ट्र- गोव्यातील ३५० विद्यार्थी फसले आहेत. यात गोव्यातील ४५, तर महाराष्ट्रातील ३०५ विद्यार्थी आहेत. सर्वाधिक विद्यार्थी नागपूर केंद्राचे आहेत. या विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे अडकून पडली आहेत. ती मिळावी आणि पोलीस कारवाईचा अंदाज घ्यावा, यासाठी गुन्हे शाखेबाहेर पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यातील काही विद्यार्थ्यांनी ही भावना व्यक्त केली.दिल्लीतील एका तरुणाने सैन्य भरतीसाठी १८ व्या वर्षापासून प्रयत्न सुरु केले. माजी सैनिकाचा मुलगा असल्याने त्याला सैन्यात दाखल होण्याच्या नफा-नोट्यांची पूर्ण माहिती होती. त्यामुळे त्याने पूर्ण जोर लावला. मात्र, प्रयत्न करून हाती यश येत नव्हते. आताची त्याची नववी वेळ होती. ‘यंदा नव्या जोमाने जोरदार तयारी करून पुण्यात आलो होतो. लेखी परीक्षेच्या आदल्या दिवशी सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये सिव्हिल युनिफॉर्ममधील दोघांनी माझ्याशी ओळख वाढवून पेपरबाबत विचारणा केली. कॅम्पबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी एकापाठोपाठ विचारणा केली. तसेच गाडीतून एका हॉलमध्ये नेले. तेथे त्यांनी जवळपास २८ प्रश्न दिले आणि अडीच लाखांची मागणी केली. हे पैसे निकालानंतर द्यायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असाच प्रकार इतरही काही जणांनी झाला,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सैन्यात भरती होण्याचे खुळ असल्याने त्यांनी पालकांशी चर्चा केली नाही अथवा घरातील मोठ्या व्यक्तींशी न बोलता केलेले धाडस अंगलट आले आहे. पुढे काय वाढून ठेवले आहे, याची भीती त्यांच्या डोळ्यापुढे आहे. आता कसे तोंड दाखवायचे. त्यांना काय सांगायचे, ही भीतीही त्यांना सतावते आहे. (प्रतिनिधी)
घरच्यांना कसे तोंड दाखवू?
By admin | Updated: March 1, 2017 03:41 IST