चौपदरीकरणासाठी आणखी किती बळी ?

By Admin | Updated: August 18, 2014 22:38 IST2014-08-18T22:13:46+5:302014-08-18T22:38:45+5:30

कंपनी आणि केंद्र शासनाच्या वादात अडकले महामार्ग विस्तारीकरण

How many more sacrifices for four-laning? | चौपदरीकरणासाठी आणखी किती बळी ?

चौपदरीकरणासाठी आणखी किती बळी ?

अकोला : पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. आणखी सहा निष्पाप जीवांना प्राणास मुकावे लागले. अरुंद रस्ता आणि महामार्गाची झालेली दुरवस्था यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असतानाही केवळ वाढीव निधीच्या मुद्यावर महामार्गाचे विस्तारीकण रखडले आहे. मंगळवारच्या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा चौपदरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून आणखी किती बळी घेतल्यानंतर केंद्र शासन आणि कंपनीच्या अधिकार्‍यांचे डोळे उघडतील, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून उपस्थित होत आहे. पश्‍चिम विदर्भाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे अमरावती ते जळगावपर्यंतच्या २७५.२५ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

जमीन हस्तांतरण आणि पर्यावरण विभागाची मान्यता या अडचणी केव्हाच दूर झाल्या आहेत. हे कंत्राट एल अँण्ड टी इन्फ्रास्ट्रर डेव्हलपमेंट प्रोजेक्टस् लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. ३0 महिन्यांच्या अवधीमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या अटीवर निविदा स्वीकृती करण्यात आली होती. प्रत्यक्षात हे काम दोन वर्षांपूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. असे असतानाही अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली नाही. या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यास वाहतूक व विकासाला चालना मिळणार आहे. करारनाम्यानुसार काम सुरू करण्यास विलंब झाल्याने, कंपनीने दरवाढ व ह्यआयडामिंग कॉस्टह्णच्या भरपाईची मागणी आणि प्रीमियमची पुनर्रचना करून, १0 टक्के दराची सवलत मागितली आहे; परंतु सवलतदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यादरम्यान कोणताही तोडगा निघाला नसल्याने, या महामार्गाचे काम रखडले आहे.

कंपनी आणि केंद्र शासनाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यापैकी कुणीही तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने २७५ किलोमीटर अंतरावर महामार्गाच्या लगत असलेल्या गावांमधील ग्रामस्थांना जीव मुठीत धरूनच जगावे लागत आहे. रस्ता ओलांडताना कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याचा नेम नसल्याने या मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: How many more sacrifices for four-laning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.