Sharad Pawar News: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यापूर्वी दिल्लीत दोन लोक मला भेटायला आले. त्यांची नावे आता माझ्याकडे नाहीत. त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात २८८ जागा आहेत. आम्ही तुम्हाला (महाविकास आघाडी) १६० जागा निवडून येण्याची हमी देतो. त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर आपण त्यांची भेट राहुल गांधी यांच्याशी घालून दिली; पण त्यावेळी राहुल गांधी व मी दोघांनीही हा आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळवू, असा निर्णय घेतला, असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी अलीकडेच केला. यानंतर यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या.
शरद पवार यांची री ओढत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत विधान केले. निवडणूक आयोगात इतके घोटाळे आहे. शरद पवार यांनी मुद्दा मांडला, निवडणुकीपूर्वी लोक भेटले आणि १६० जागा देतो. आम्हाला ही लोक भेटले आहे. उद्धव ठाकरे यांना लोकसभेला आणि विधानसभेला पण हे लोक भेटले होते. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही लोकांमध्ये जाऊ. लोकसभेला आम्हाला यश प्राप्त झाले आहे. तेव्हा पुन्हा ते विधानसभेलाही मिळेल. ते म्हणालेले ६०-६५ जागा कठीण जागा सांगा, आम्ही त्या देऊ. पण आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. यानंतर आता एखादा छोटा कार्यकर्ता अनेक वर्षांनी भेटला, तरी त्याला नावानिशी ओळखणारे आणि हाक मारणाऱ्या शरद पवारांना ती नावे कशी आठवत नाहीत, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शरद पवार यांची आख्यायिका
विधानसभा निवडणुकीआधी आपल्याला दिल्लीत दोन माणसे भेटली. ती १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी करून देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. मात्र, त्या व्यक्ती कोण होत्या ते आपल्याला आठवत नाही, असेही त्यांनी सांगितले. यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली नाही तरच नवल. एखादा कार्यकर्ता अनेक महिने, वर्षांनी भेटला तरी त्याला ते नावाने हाक मारतात. मग सत्ता आणून देण्याची गॅरंटी देणाऱ्या त्या माणसांची नावे ते कसे विसरले? त्या दोन व्यक्तींना कोण घेऊन आले होते, याबाबत तरी त्यांनी काही सांगावे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, दोन व्यक्तींकडून १६० जागांची हमी देण्यात आली होती या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून, त्यांच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार हे जबाबदार नागरिक आहेत. जर अशा प्रकारे त्यांच्याकडे कुणी आले होते तर त्यांनी पोलिस किंवा निवडणूक आयोगाकडे लगेच तक्रार का केली नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.