गोरक्षक गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
By Admin | Updated: August 8, 2016 12:44 IST2016-08-08T12:44:54+5:302016-08-08T12:44:54+5:30
गोमांस आणि गोरक्षेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरक्षक इतक्या मोठ्या संख्येने गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? असा सवाल विचारला आहे

गोरक्षक गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 8 - गोमांस आणि गोरक्षेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य धाडसी म्हणत कौतुक केलं आहे. मात्र कौतुक करत असताना हे गोरक्षक इतक्या मोठ्या संख्येने गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? असा सवाल विचारत कोपरखळीही मारली आहे. उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून हे वक्तव्य केलं आहे.
मोदी यांच्या धाडसी वक्तव्याचे आम्हाला कौतुक आहे. पण आमच्यासारख्यांच्या मनातील भाबडा प्रश्न इतकाच आहे की, हे गोरक्षक इतक्या मोठ्या संख्येने गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा झेंडा घेऊन ज्या संस्था व संघटना पुढे आल्या त्यात गोरक्षा मंडळींच्या शेकडो संस्था होत्या व हेच लोक आज गोरक्षणाचा गोरखधंदा करतात असे सरकारला वाटते काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
गोरक्षेच्या नावाखाली ट्रक अडवून पैसे उकळायचे व मग याच गाईंचा सौदा करायचा हा धंदा भयंकर आहे. पंतप्रधानांनी या बोगस गोरक्षकांवर हल्ला करून दलित-मुसलमान समाजास ‘मेसेज’ देण्याचे काम केले असं कौतुकही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
गोरक्षकांनी जसा गोरखधंदा उघडून लोकांचा छळ केला आहे तसा मुंबईसारख्या शहरात ‘शाकाहारा’च्या नावाखाली अनेक बिल्डरांनी स्वत:ची वेगळी बेटे निर्माण करून मांसाहार करणार्यांना घरे नाकारण्याचे उद्योग चालवले आहेत. हासुद्धा वेगळाच गोरखधंदा असून पंतप्रधानांनी या शाकाहारवाद्यांवरही कठोर प्रहार करून त्यांना वठणीवर आणायला हवे. कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ती खासगी बाब आहे. श्रद्धेचा मान ठेवून या गोष्टी झाल्या की तणाव निर्माण होत नाही. राजकारण, उद्योग व सामाजिक क्षेत्रात आज ‘शेण’ खाऊनही लोक ताठ मानेने जगत आहेत हे पाहिले तर आता इतरांच्या खाण्यापिण्यावर बोलून वाद वाढवायचे कशाला? असा टोमणा उद्धव ठाकरेंनी मारला आहे.