युती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली?
By Admin | Updated: September 26, 2014 08:36 IST2014-09-26T03:26:31+5:302014-09-26T08:36:40+5:30
मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्याने कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे.

युती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली?
मुंबई : मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्याने कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे.
महायुतीची ताटातूट झाल्यानंतर एक तासाच्या आत राष्ट्रवादीने आघाडी तोडली हा निव्वळ योगायोग नसून या पक्षाची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत हे ओळखण्याइतपत राज्याची जनता खुळी नाही, असे सूचक भाष्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
गेली १५ वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत चकार शब्दही न काढणाऱ्या राष्ट्रवादीने राज्यापेक्षा महत्त्वाकांक्षा मोठी मानत मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. जागावाटपाबाबत अवास्तव मागण्या करून आघाडी संपुष्टात आणली, असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला.
तर राष्ट्रवादीच्या ताठरपणामुळेच आघाडी तुटल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्र परिषदेत केला. भाजपा-सेनेच्या युतीचे काय होते याची वाट पाहत बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेेत पुढाकार न घेता वेळकाढूपणा केला, असे सांगताना त्यांनी भाजपा-राष्ट्रवादीचे काही सेटिंग तर नव्हते ना, अशी शंकाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जागावाटपाची बोलणी सुरू असताना दोन दिवसांपूर्वी अचानक मुख्यमंत्रीपदाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आणि या बोलणीला खिळ बसविण्याचाच प्रयत्न केला, असा आरोप ठाकरे यांनी केला.
आज राष्ट्रवादीने आघाडी तोडली. आता उद्या आणखी काही नवीन युती अस्तित्वात येते का ते बघा असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उद्या मोठ्या राजकीय घडामोडी होऊ शकतात, असे संकेत दिले. गेल्या पावणेचार वर्षांत सरकार चालविताना अनेक बरेवाईट प्रसंग आले पण तरीही राष्ट्रवादीला सोबत नेण्याचा प्रयत्न आपण केला. राज्यातील जनतेच्या हिताआड येणारे कुठलेही निर्णय आपण घेतले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाची आणि १४४ जागांची राष्ट्रवादीची मागणी अव्यवहार्य आणि कोणत्याही निकषात बसणारी नव्हती हे सांगताना त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तर १२४ पेक्षा अधिक जागा देण्याची तयारी होती, असे ठाकरे यांनी सांगितले.
(विशेष प्रतिनिधी)