सेवाग्राम आश्रमाजवळ दारू व मांसाहाराची दुकाने कशी ?

By Admin | Updated: October 3, 2016 04:37 IST2016-10-03T04:37:30+5:302016-10-03T04:37:30+5:30

माजी खासदार विजय दर्डा यांनी राज्य शासनाला विचारून राष्ट्रपित्याच्या कर्मभूमीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन केले.

How to buy liquor and meat shops near Sevagram Ashram? | सेवाग्राम आश्रमाजवळ दारू व मांसाहाराची दुकाने कशी ?

सेवाग्राम आश्रमाजवळ दारू व मांसाहाराची दुकाने कशी ?


नागपूर : सेवाग्राम आश्रमाजवळ दारू व मांसाहाराची दुकाने कशी सुरू होऊ दिली, असा प्रश्न लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी राज्य शासनाला विचारून राष्ट्रपित्याच्या कर्मभूमीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन केले.
सिटिझन्स फोरम फॉर इक्वॅलिटीच्यावतीने रविवारी लक्ष्मीभुवन चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. माजी खासदार गेव्ह आवारी अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार विलास मुत्तेमवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे, माजी आमदार यादवराव देवगडे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेच्या माजी अधिष्ठाता थ्रिटी पटेल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सेवाग्राम आश्रमाचे महात्म्य जपण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल दर्डा यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, विदर्भ ही महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. केवळ राजघाटावर जाऊन त्यांना समजता येणार नाही. त्यासाठी विदर्भातील सेवाग्राम आश्रमात यावे लागेल. परंतु, सेवाग्राम आश्रमाची सध्याची अवस्था पाहून दु:ख वाटते. आश्रमाजवळ दारू व मांसाहाराची दुकाने सुरू झाली आहेत. हा आश्रम दुसऱ्या देशात असता तर, एक किलोमीटरपर्यंतचा परिसर संरक्षित करण्यात आला असता. आश्रमातील राष्ट्रीय वारसा असलेल्या वस्तूही चोरीला जात आहेत. यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला असता हा राज्य शासनाचा विषय असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्यात आली. हा केंद्र किंवा राज्य शासनाचा नाही तर, संपूर्ण जगाचा विषय आहे हे आपण समजून घ्यायला तयार नाही.
महात्मा गांधी ईश्वर होते. अशी व्यक्ती भारतात होऊन गेली यावर १०० वर्षानंतर कुणी विश्वास करणार नाही. परंतु, ईश्वर दिसत नसला तरी, त्याचे अस्तित्व आपण मानतो. असेच महात्मा गांधी यांच्याबाबत आहे. त्यांनी भगवान महावीर व भगवान गौतम बुद्ध यांचे अहिंसा तत्त्व अंगिकारून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. यानंतर गांधी विचारांच्या प्रभावामुळे अन्य ३० ते ४० देश स्वातंत्र झालेत, असे दर्डा यांनी सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्रपित्याचे महात्म्य जाहीरपणे सांगितले आहे. महात्मा गांधी नसते तर, आपण राष्ट्राध्यक्ष नसतो, असे ते म्हणाले होते. जगात खादीचे महत्त्व महात्मा गांधी यांच्यामुळेच वाढले. आपल्यासाठी खादी केवळ वस्त्र नसून तो एक
विचार व शक्ती आहे. महात्मा गांधी यांची केवळ आठवण करण्यापेक्षा त्यांचे विचार सर्वांनी अंगिकारायला हवेत. दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला विकासाच्या दिशेने नेले. त्यांनी
‘जय जवान, जय किसान’ हा
नारा दिला असे विचारही दर्डा यांनी मांडले. (प्रतिनिधी)
>आधुनिक चरख्याने वेधले लक्ष
कार्यक्रमस्थळी आधुनिक चरखा ठेवण्यात आला होता. या चरख्याने सर्वांचे लक्ष वेधले. अमरावती रोडवरील सर्वोदय आश्रम येथे रहात असलेल्या चेतन पानसे या विद्यार्थ्याने हा चरखा आणला होता. बजाज फाऊंडेशनने गुरुदेव सेवा मंडळाला हे आधुनिक चरखे दिले होते. यापैकी दोन चरखे सर्वोदय आश्रमात आहेत. या चरख्यांवर तयार केलेले सुत गोपुरी वर्धा येथे देण्यात येते. या ठिकाणी खादीचे वस्त्र तयार केले जातात. या उपक्रमातून वस्त्र स्वावलंबनाचा विचार समाजात पेरला जात आहे.

Web Title: How to buy liquor and meat shops near Sevagram Ashram?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.