घर बांधायचे कसे
By Admin | Updated: July 18, 2014 01:13 IST2014-07-18T01:13:41+5:302014-07-18T01:13:41+5:30
मालकीचे घर असावे, असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. मात्र सध्या बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्णत्वास येईल की नाही, अशी शंकाच निर्माण झाली आहे.

घर बांधायचे कसे
साहित्याच्या किमतीत वाढ : मध्यमवर्गीयांना चिंता
नागपूर : मालकीचे घर असावे, असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. मात्र सध्या बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्णत्वास येईल की नाही, अशी शंकाच निर्माण झाली आहे. घर बांधकामासाठी आवश्यक असणारे सिमेंट, रेती, वीट, सळाक, गिट्टी, लाकडी व लोखंडी दरवाजे यांच्या बरोबरच बांधकामावर काम करणारे मिस्त्री व मजुरांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. बांधकामाच्या बजेटमध्ये सव्वा ते दीडपटीने वाढ झाल्याने अनेकांनी बांधकाम बंद केल्याची माहिती आहे. मागील काही महिन्यांपासून नवीन घर बांधण्याचा विचारच सामान्य माणसाला स्वप्नवत वाटू लागला आहे.
इतर साहित्यही महागले
सिमेंट, सळाख, रेती, गिट्टी, विटा, टाईल्स, प्लंबिंग साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स फिटिंगचे साहित्यही महागले आहेत. त्याचा बांधकामावर परिणाम झाला आहे. वर्षभरातच बांधकामाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. एकंदरीतच बांधकामाच्या साहित्याच्या वाढलेल्या किंमती पाहून सर्वसामान्य माणसाला घर बांधणे कठीण झाले आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे स्वप्नच मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेती ८,००० रुपये ट्रक
रेतीची किंमती दुपटीवर गेली आहे. रेतीचा एक ट्रक (२५० फूट रेती) आठ हजारांच्या घरात गेल्याने सर्वसामान्य माणसासोबतच बांधकाम व्यावसायिकांनादेखील जबर फटका बसला आहे. गेल्यावर्षी १६ ते १८ रुपये प्रति घनफूट असणारे रेतीचे दर आता थेट ३२ ते ३५ रुपयांवर गेल्याने बांधकामाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
विटा ५२५० रु. हजार
घराच्या भिंती उभ्या करण्यासाठी विटांची गरज असते. सध्या विटांचे दर सर्वोच्च स्थानी पोहोचले असून गेल्यावर्षभरात २५ टक्के वाढ झाली आहे. आज १००० विटांसाठी ५२५० रुपये मोजावे लागत आहेत. बांधकामाचे इतर साहित्य वाढताच वीट उत्पादकही हळूच दरवाढ करतात.
सिमेंट३२० ते ३८० रु. पोते
जून महिन्याच्या तुलनेत सध्या ९० ते १२० रुपये प्रति बोरे (५० किलो) अशी वाढ होऊन किंमत ३८० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भांडवलशाहीचे हे मोठे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया बिल्डर्सनी लोकमतशी बोलताना दिली. सिमेंटच्या वाढीव दरामुळे बांधकामाची किंमत वाढली आहे.
गिट्टी ६५०० रु. ट्रक
क्युबिक फूटमध्ये मिळणाऱ्या गिट्टीचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या दर २४ ते ३० रुपये क्युबिक फूट आहे. सुरू असलेले बांधकाम आणि मागणीनुसार विक्रेते गिट्टीचे दर ठरवितात. सिमेंट वाढल्याने गिट्टीचे दर वाढू शकतात, अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
सळाक ४५ रु. किलो
घराच्या बांधकामात सळाख हा तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. सळाखीच्या दराची तीच स्थिती आहे. जूनच्या महिन्याच्या तुलनेत प्रति टन ५ हजाराची वाढ होऊन दरपातळी ४५ हजारांवर गेली. वर्षभरात झालेली भाववाढ पाहून सर्वसामान्य पुरता बेजार झाला आहे.