मुंबईतील घरांच्या किंमती चढ्याच
By Admin | Updated: May 16, 2015 03:21 IST2015-05-16T03:21:30+5:302015-05-16T03:21:30+5:30
फ्लॅटवरील व्हॅटचे मूल्यांकन करताना तेथील भूखंडाची रेडी रेकनरनुसार किंमत व प्रत्येक मजल्याचा स्वतंत्र बांधकाम खर्च ग्राह्य धरणाऱ्या राज्य शासनाच्या
मुंबईतील घरांच्या किंमती चढ्याच
अमर मोहिते, मुंबई
फ्लॅटवरील व्हॅटचे मूल्यांकन करताना तेथील भूखंडाची रेडी रेकनरनुसार किंमत व प्रत्येक मजल्याचा स्वतंत्र बांधकाम खर्च ग्राह्य धरणाऱ्या राज्य शासनाच्या परिपत्रकावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या पद्धतीनुसार गेल्या वर्षीपासून बिल्डर भरत असलेला व्हॅट यापुढेही त्यांना भरावा लागेल. या परिपत्रकामुळे यापुढेही घरांचे दर हे चढेच राहणार आहेत.
याआधी फ्लॅटवरील व्हॅट भूखंडाची किंमत रेडीरेकनर व एफएसआय धरून ठरवला जात होता. तसेच एकूण बांधकाम खर्च यात ग्राह्य धरला जात होता. मात्र गेल्या वर्षी शासनाने नव्याने परिपत्रक काढून भूखंडाच्या किमतीतून रेडीरेकनर व एफएसआय वगळला. तसेच प्रत्येक मजल्याचा स्वतंत्र बांधकाम खर्च ग्राह्य धरला जाईल, असे स्पष्ट केले. पण बिल्डरांना अशा प्रकारे व्हॅटचे मूल्यांकन करणे शक्य नसल्याने त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यावर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. सुनील देशमुख यांनी हा निकाल दिला आहे. मात्र चुकीच्या मूल्यांकनाने बिल्डरांना अधिक व्हॅट भरावा लागल्यास त्यांनी मूल्यांकन अधिकाऱ्यासमोर भूखंडाची किंमत व बांधकाम खर्चाचा लेखाजोखा ठेवावा. त्यानंतर या दोन्ही तपासणी केल्यावर मूल्यांकन अधिकारी योग्य तो निर्णय देईल आणि बिल्डरांकडून अधिक व्हॅट घेतला गेला असल्यास त्याची अतिरिक्त रक्कम त्यांना परतही मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शासनाच्या परिपत्रकाविरोधात बिल्डर असोसिएशनने अॅड. विनायक पाटकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.