मुंबईत घरे महागणार ?
By Admin | Updated: February 10, 2015 02:39 IST2015-02-10T02:39:30+5:302015-02-10T02:39:30+5:30
मुंबई उपनगरांत गृहनिर्माण सोसायट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरांना राज्य शासनाकडून खरेदी कराव्या लागणा-या चटईक्षेत्र निर्देशांकाच्या

मुंबईत घरे महागणार ?
मुंबई : मुंबई उपनगरांत गृहनिर्माण सोसायट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरांना राज्य शासनाकडून खरेदी कराव्या लागणा-या चटईक्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) दरात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
आतापर्यंत २००८ च्या रेडिरेकनर दराच्या ३० टक्के दरात एफएसआय विकला जात होता. आता चालू वर्षीच्या रेडिरेकनरच्या दराच्या ६० टक्के इतका एफएसआयचा दर असेल. सरकारला या निर्णयामुळे वर्षाकाठी ७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. मात्र, इतका महागडा एफएसआय खरेदी करायला बिल्डर पुढे येतील का, याबाबत साशंकता आहे. त्यापेक्षा टीडीआर घेण्याकडे त्यांचा कल असेल. महागडा एफएसआय खरेदी करून घरे बांधली गेली तर ती देखील महागतील आणि त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो.
कृषी जमीन, बिगरकृषी करणे वा जमिनीच्या अन्य कुठल्याही स्वरुपात बदल करण्यासाठी ठोस धोरण लागू करण्यावर राज्य शासन विचार करीत आहे. आतापर्यंत वैयक्तिक प्रकरणांमध्ये परिस्थितीनुरुप या स्वरुप बदलाबाबत निर्णय घेतला जातो. आता सर्वसमावेशक धोरण आणून ते सर्वांसाठी लागू करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. (विशेष प्रतिनिधी)