एक इस्पितळ असेही!
By Admin | Updated: February 3, 2015 01:03 IST2015-02-03T01:03:00+5:302015-02-03T01:03:00+5:30
अर्धवट उघडलेले, गंजलेल्या लोखंडी द्वाराच्या आत प्रवेश करताच मोठे भकास चित्र नजरेस भिडते. याच इमारतीत औषधाचे दुकान, बाह्यरुग्ण विभागाचा गंज लागलेला फलक टांगलेला आहे. काऊंटरही आहे.

एक इस्पितळ असेही!
ना रुग्ण, ना डॉक्टर : नागरिक सहकारी रुग्णालय झाले भकास
राजीव सिंह - नागपूर
अर्धवट उघडलेले, गंजलेल्या लोखंडी द्वाराच्या आत प्रवेश करताच मोठे भकास चित्र नजरेस भिडते. याच इमारतीत औषधाचे दुकान, बाह्यरुग्ण विभागाचा गंज लागलेला फलक टांगलेला आहे. काऊंटरही आहे. येथे विविध उपचाराच्या शुल्काचेही फलक आहेत.
इमारतीच्या आत प्रवेश करताच जागोजागी तुटलेल्या भिंती, खोल्यांतील फाटलेले पडदे दिसतात. हे वाचून कुठली तरी जर्जर इमारत असावी, असा जर तुमचा अंदाज असेल तर तसे नाही, एकेकाळी शहरातील प्रतिष्ठित असलेल्या इस्पितळाची ही इमारत आहे. नागरिक सहकारी रुग्णालय, असे त्या इस्पितळाचे नाव.
नोव्हेंबर २०१३ पासून हे इस्पितळ बंद आहे. पूर्वी या इस्पितळात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपासून गंभीर रुग्णांवर उचपार केले जायचे. इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २० ते २५ रुग्ण यायचे. ६५ खाटांच्या या इस्पितळात सुमारे २० डॉक्टर आणि १५-२० कर्मचारी आपली सेवा देत होते.
इस्पितळाच्या दुर्दशेमुळे ९० टक्के कर्मचारी व परिचारिकांनी ‘व्हीआरएस’ घेतला. असे असतानाही १० टक्के कर्मचारी व संचालक मंडळाला एक दिवस या इस्पितळाचे जुने दिवस पुन्हा परत येतील, ही आशा आहे. या इस्पितळात आजही काही कर्मचारी तैनात असतात. त्यांना विचारल्यावर त्यांनी इस्पितळ सुरू असल्याचे सांगितले. फक्त बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग बंद असल्याचे ते म्हणाले.
बंद पडले इस्पितळ
१९७० मध्ये इस्पितळ सुरू करण्याच्या हालचालीला वेग आला. ६६ हजार वर्गफूट परिसरात पसरलेले हे इस्पितळ अलंकार चित्रपटगृहाच्यासमोर आहे. इस्पितळ सुरू झाल्यापासूनच तोट्यात आहे. यामुळेच संचालक मंडळाने याला सहकारी योजनेच्या आधारावर चालविण्याची योजना २०१० मध्ये तयार केली. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर २०१२ मध्ये यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आले. एक वर्षाच्या प्रक्रियेनंतर अर्नेजा हॉस्पिटल प्रा. लिमिटेडसोबत करार झाला. परंतु यादरम्यान जनहित याचिकेमुळे करार थांबला. आता हे प्रकरण सुप्रीम कार्टात असून, सुनवाणी सुरू आहे.
समृद्ध इतिहास
१९७५ मध्ये नागरिक सहकारी रुग्णालय सोसायटीद्वारा संचालित या इस्पितळात रुग्ण भरती सेवा सुरू झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी जलसंपदा मंत्री वसंतरावदादा पाटील व माजी आरोग्य मंत्री प्रगती पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी इस्पितळाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष नाशिकराव तिरपुडे उपस्थित होते. इस्पितळ सुरू करण्याचा उद्देश माफक दरात औषधोपचार करण्याचा होता. २५ सदस्यांच्या संचालक मंडळात डॉक्टर, समाजसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर होते. सध्या मंडळाचे अध्यक्ष अनंतराव घारड हे आहेत.