रुग्णालयांना दरफलकाचे बंधन
By Admin | Updated: September 11, 2014 03:16 IST2014-09-11T03:16:43+5:302014-09-11T03:16:43+5:30
शासकीय रुग्णालयांप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचाराचे दरफलक लावण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांनी दिल्या आहेत.

रुग्णालयांना दरफलकाचे बंधन
सदानंद औंधे, मिरज
शासकीय रुग्णालयांप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचाराचे दरफलक लावण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांनी दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयात उपचार खर्चाचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. फलक न लावणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात
येणार आहे.
खासगी डॉक्टरांच्या फीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रुग्णावर उपचार केल्यानंतर अवास्तव बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेची सुनावणी करताना न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. डी. केंद्रे यांच्या खंडपीठाने रुग्णाला उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची आगाऊ कल्पना द्यावी. त्यासाठी विविध आजारांवरील खर्चाचा फलक भिंतीवर लावावा. त्याची आरोग्य विभागाने अंमलबजावणी करावी, असा निर्णय दिला होता.
खासगी डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवेवर नियंत्रण ठेवणारा ‘बॉम्बे नर्सिंग अॅक्ट’ राज्यात अस्तित्वात आहे. रुग्णांच्या लुबाडणुकीस प्रतिबंध करणारा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट’ हा नवीन कायदा केंद्र शासनाने मंजूर केला आहे. त्यास इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतल्याने राज्यात हा कायदा अजून लागू झालेला नाही.