अश्व धावला उभ्या रिंगणी!
By Admin | Updated: July 24, 2015 01:30 IST2015-07-24T01:30:12+5:302015-07-24T01:30:12+5:30
विठुनामाचा सुरू असलेला अखंड नामजप, आल्हाददायक असलेले सकाळचे कोवळे ऊन अशा उत्साही वातावरणात देहूहून आषाढी एकादशी सोेहळ्यासाठी मार्गक्रमण करीत असलेल्या संत

अश्व धावला उभ्या रिंगणी!
संदीप लोणकर/शहाजी फुरडे-पाटील, माळीनगर
विठुनामाचा सुरू असलेला अखंड नामजप, आल्हाददायक असलेले सकाळचे कोवळे ऊन अशा उत्साही वातावरणात देहूहून आषाढी एकादशी सोेहळ्यासाठी मार्गक्रमण करीत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सकाळी माळीनगरमध्ये पहिले उभे रिंगण झाले़ सुमारे अडीच किमी लांब रस्त्यावरच झालेल्या या रिंगण सोहळ्याचा उत्साह घेऊन पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी लवंगकडे मार्गस्थ झाला़
सहकार पंढरी अकलूज येथील मुक्काम उरकून पालखी सोहळा माळीनगरकडे मार्गस्थ झाल्यानंतर माळीनगरवासीय व वारकरी उभ्या रिंगण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पालखी सोहळ्याची वाट पाहत थांबलेले होते़ तोपर्यंत रथापुढील व रथापाठीमागील दिंंड्या रस्त्याच्या कडेला एका रेषेत उभ्या राहून विठ्ठलनामाच्या भजनात तल्लीन होऊन नाचत होते़ काकासाहेब चोपदार यांनी पाहणी केल्यानंतर माळीनगर साखर कारखान्याच्या समोरच्या रस्त्यावर मध्यभागी उभ्या असलेल्या रथाच्या पुढे व पाठीमागील बाजूस वारकरी तल्लीन होऊन नाचत असतानाच चोपदारांनी अश्व रिंगणात सोडला़ रथाच्या पुढील सत्तावीस क्रमांकाच्या दिंंडीपर्यंत धावत जाऊन अश्वाने संत तुकारामांच्या पालखीला एक प्रदक्षिणा घालून पादुकांचे दर्शन घेतले़ अश्वाची धाव पूर्ण होताच वारकऱ्यांनी फुगड्या व मनोऱ्याचे खेळ खेळत आनंद साजरा केला़