मृत्यूची ‘आगाऊ’ दहशत पसरविणारी भोंदू वेबसाईट

By Admin | Updated: January 19, 2015 00:56 IST2015-01-19T00:56:52+5:302015-01-19T00:56:52+5:30

मृत्यू हा शब्द उच्चारला तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. मृत्यू अटळ असला तरी तो येऊच नये, असे वाटते. नेमका मृत्यू कसा आणि कोठे होईल, हे पृथ्वी तलावर कुणालाही सांगणे शक्य नाही.

The horror website that spreads 'advance' panic of death | मृत्यूची ‘आगाऊ’ दहशत पसरविणारी भोंदू वेबसाईट

मृत्यूची ‘आगाऊ’ दहशत पसरविणारी भोंदू वेबसाईट

यम है हम : संकेतस्थळावर अंधश्रद्धेला खतपाणी
गजानन चोपडे - नागपूर
मृत्यू हा शब्द उच्चारला तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. मृत्यू अटळ असला तरी तो येऊच नये, असे वाटते. नेमका मृत्यू कसा आणि कोठे होईल, हे पृथ्वी तलावर कुणालाही सांगणे शक्य नाही. मात्र आपले नाव आणि जन्म तारीख टाकल्यावर मृत्यू कोठे, कधी आणि कसा होणार हे कळले तर...! विश्वास बसत नाही ना... पण काही महाभागांनी असे एक संकेत स्थळच निर्माण केले. मृत्यूची नेमकी तारीख सांगण्याचा दावा करणाऱ्या या संकेत स्थळाचा भीतीयुक्त बोलबाला सध्या नेटीजन्समध्ये आहे. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालण्याचा ‘यम है हम’ असाच प्रकार विविध अ‍ॅप्स्वरूनही फिरत आहे.
तंत्रज्ञानाने जग जवळ आले. मानवी संवेदना एकमेकांना कळू लागल्या. तंत्रज्ञानाचे अनंत फायदे मानव जातीला होऊ लागले. मात्र या तंत्रज्ञानाचाच आता काहींनी वाईट हेतूनेही वापर सुरू केला आहे. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालणेही सुरू आहे. सर्व जग एका क्लिकवर आणणाऱ्यांनी आता मृत्यूलाही त्याच क्लिकवर आणून ठेवले की काय, असे वाटायला लागते.
या संकेतस्थळावर ‘क्लिक टू फार्इंड हाऊ यु विल डाय?’ असे लिहिलेल्या ठिकाणी क्लिक करताच तुमचे पूर्ण नाव आणि जन्म वर्ष विचारले जाते. ही माहिती रकान्यात भरली की तुमच्या मृत्यूचे वर्ष आणि कारण स्क्रिनवर दिसायला लागते. अशी हायटेक भोंदूगिरी करणारे सदर माहिती फेसबुकवर शेयर करण्याचा तुम्हाला सल्लादेखील देतात. या वेबसाईटला चाचपून पाहण्यासाठी एका कास्तकाराचे नाव आणि जन्म वर्ष नमूद केले असता त्याच्या मृत्यूचे वर्ष २०२७ सांगण्यात आले. म्हणे या इसमाचा मृत्यू अतिरेकी हल्ल्यात होणार आहे. कुठे हा खेड्यातला शेतकरी अन् कुठे अतिरेक्यांच्या बंदुका. थोडक्यात म्हणजे अशी भंपक माहिती पसरवून दहशत निर्माण केली जात आहे. थोतांड ‘यम’च्या या संकेतस्थळावरून तुमच्या मरणाचा वार निश्चित केला जातो.
चित्रगुप्तालाही ठाऊक नसेल एवढी माहिती या संकेतस्थळाजवळ असल्याचा फोल दावा आहे. ‘दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए’, असाच काहीसा प्रत्यय ही साईट पाहताना येतो. अनेक महाभागांनी आपल्या मृत्यूची वेळ आणि दिवस या संकेतस्थळावर बघितला असेल. परंतु संकेतस्थळाने सांगितल्याप्रमाणेच मृत्यू झाल्याचा दावा आजपर्यंत कुणीही केलेला नाही, एवढे मात्र खरे.

Web Title: The horror website that spreads 'advance' panic of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.