अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्याची घरवापसी, व्यसनापायी उद््ध्वस्त झाले घर-कुटुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:53 IST2018-03-06T06:53:42+5:302018-03-06T06:53:42+5:30
कुटुंबातल्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी त्याला मार्ग हवा होता, पण तो नकळत अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढला गेला. त्यांची गँग बनली आणि ती सीमेवर जाऊन अमली पदार्थ आणू लागली. त्याच्या आहारी जाताना त्याचे मानसिक संतुलन बिघडले. घर उद्ध्वस्त झाले आणि पत्नीही सोडून गेली. सध्या तो ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आहे. उपचारानंतर तो बरा झाला असून लवकरच त्याची घरवापसी होणार आहे.

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्याची घरवापसी, व्यसनापायी उद््ध्वस्त झाले घर-कुटुंब
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - कुटुंबातल्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी त्याला मार्ग हवा होता, पण तो नकळत अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढला गेला. त्यांची गँग बनली आणि ती सीमेवर जाऊन अमली पदार्थ आणू लागली. त्याच्या आहारी जाताना त्याचे मानसिक संतुलन बिघडले. घर उद्ध्वस्त झाले आणि पत्नीही सोडून गेली. सध्या तो ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आहे. उपचारानंतर तो बरा झाला असून लवकरच त्याची घरवापसी होणार आहे.
३३ वर्षांचा अमरिंदर सिंग (रुग्णाचे नाव बदलले आहे) हा पंजाब येथील अनंतपूर साहेबा येथील रहिवासी आहे. पोलिओने आजारी असलेली आई, भाऊ, पत्नी, १४ वर्षांची मुलगी असा त्याचा मध्यमवर्गीय परिवार असून संगणकाचे शिक्षण पूर्ण करून तो कॉम्प्युटर आॅपरेटर म्हणून कामाला होता. त्याचा स्वभाव थोडा तापट असल्याने घरात क्षुल्लक कारणावरून त्याचे खटके उडत. या वादविवादाने तो तणावाखाली गेला. तेव्हा घराच्या बाजूला राहणारा मित्र तेथे आला. या तणावातून मुक्त करतो, असे सांगून गाडीत बसवून घेऊन गेला. एका हॉटेलात काहीसे प्यायला दिले आणि अमरिंदरला तणावमुक्त वाटू लागले. आपण अमली पदार्थांचे सेवन केले, हे सुरुवातीला त्याला माहीत नव्हते. हळूहळू त्याच्यासोबत काही मित्र जोडले गेले, त्यांची साखळी तयार झाली आणि ही गँग मिळून अमली पदार्थांचे सेवन करू लागली. हे अमली पदार्थ आणण्यासाठी ते पंजाबच्या सीमेवर ते जाऊ लागले. तेथून ते अमली पदार्थ आणत आणि एका ठिकाणी जमून सेवन करत. अमरिंदर या पदार्थांच्या जाळ्यात ओढला जाऊ लागला. यात त्याचे घर उद््ध्वस्त होत होते, याची त्याला जाणीवही नव्हती. त्यानंतर तो अमली पदार्थांचे इंजेक्शन घेऊ लागला. या इंजेक्शनसाठी एक हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागत असल्याचे त्याने सांगितले.
अनेकदा तो सहासहा महिने नशेत असायचा. कधी घरी, तर कधी सतत बाहेर असायचा, अशी माहिती त्याच्या भावाने दिली. तीन ते चार वर्षे तो या जाळ््यात अडकला होता. त्याच्या या वागणुकीला कंटाळून १८ महिन्यांपूर्वी त्याची पत्नी मुलीला घेऊन निघून गेली. नशेच्या आहारी जाऊन त्याने घरातील सर्व संपत्ती दावणीला बांधली. पैसे संपत गेले. नशेसाठी त्याकडे काहीही राहिले नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने अमली पदार्थांची विक्री सुरू केली आणि त्यातून येणाºया कमिशनमधून तो स्वत:साठी अमली पदार्थ विकत घेऊ लागला. या नशेतच त्याने मुंबई कशी गाठली, हे त्यालाही कळले नाही.
सहारा पोलिसांना तो रस्त्यावर भटकताना आढळला. त्यावेळीही तो नशेतच होता. पोलिसांनी त्याला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. तीन महिन्यांच्या उपचारानंतर तो बरा झाला असून त्याची घरवापसी होईल. सध्या ती प्रक्रिया सुरू असल्याचे नेपच्यून फाउंडेशनने सांगितले. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्याला वेळीच सावरले, तर त्याचे आयुष्य वाचेल अन्यथा त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो, असे अमरिंदर भावुक होऊन सांगत होता. एकदा त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे तो म्हणाला.