मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची तोफ आज 1 मे रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर धडाडणार आहे. 'मशिदीवरील भोंगा हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर राज ठाकरे यांची सभा होत असल्याने व्यासपीठ कसे असणार याची सर्वांना उत्सुकता होती. यातच राज ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपीठामागे भगव्या पडद्यावर राजमुद्रा आणि रेल्वे इंजिन दिसत आहेत. तसेच शहरात आणि सभास्थळी लावलेल्या भगव्या झेंड्यांवर देखील रेल्वे इंजिन दिसल्याने चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राज ठाकरे यांच्या सभेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्र्यांना राजकीय सभा आणि सुव्यवस्था यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी विनंती केली आहे. "राजकीय सभा आणि राजकीय कार्यक्रम लोकशाहीत सुरूच असतात. कायदा आणि सुव्यवस्था तसेच राज्यात शांतता ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. यादृष्टीने संपूर्ण पोलीस विभाग तयारी करत आहे. ते सज्ज आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी अपेक्षा आहे. अशा काही घटना घडल्यास त्याला सामोरं जाण्यासही पोलीस तयार आहेत. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी विनंती आहे" असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीनंतर राज्यात दंगली होतील का? असे याआधी गृहमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात दंगली होतील असे काही वातावरण नाही. मात्र पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. देशात काही राज्यात दंगे झाले आहेत. महाराष्ट्रातही तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. पण, महाराष्ट्रात पोलीस तयारीत आहेत. जे कुणी असा प्रयत्न करत असतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ. देशासमोर महागाई, सीमा सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अशी अशांतता काही घटक निर्माण करत आहेत. हे घटक कोण आहे ते पोलीस तपासात समोर येईल असंही त्यांनी सांगितलं होतं.