कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत गृह विभागाला जाग
By Admin | Updated: July 14, 2014 03:33 IST2014-07-14T03:33:31+5:302014-07-14T03:33:31+5:30
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या दोषी व कच्च्या कैद्यांच्या आवश्यक सुविधांबाबत दक्ष असणाऱ्या गृह विभागाला आता त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत जाग आली आहे

कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत गृह विभागाला जाग
जमीर काझी, मुंबई
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या दोषी व कच्च्या कैद्यांच्या आवश्यक सुविधांबाबत दक्ष असणाऱ्या गृह विभागाला आता त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत जाग आली आहे. राज्यभरातील विविध २६ लहान-मोठ्या तुरुंगांमध्ये ४७ नवीन स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल ५० लाख ६५ हजारांवर निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या ९ महिन्यांपासून त्याच्या प्रस्तावाची फाईल गृह विभागाकडे प्रलंबित होती.
राज्यात एकूण विविध प्रकारची ४७ कारागृहे असून, त्या ठिकाणी सुमारे एक हजारावर महिला कार्यरत आहेत. दुरवस्थेतील स्वच्छतागृहाबाबत कित्येक वर्षांपासून तक्रार केली जात असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. गँगस्टर अबू सालेमवर गेल्या वर्षी तळोजा कारागृहामध्ये छोटा राजन टोळीतील गुंडांकडून गोळीबार करण्यात आला होता. त्या वेळी जेलमधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आल्यानंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी गेल्या वर्षी ३० जुलैला कारागृह विभागाच्या आढाव्याबाबतची बैठक घेतली होती. त्यामध्ये महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीच्या स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असताना, त्यावर नवीन बांधकामासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार तुरुंग विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी राज्यभरातील मध्यवर्ती, जिल्हा व कारागृहांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन २६ जेलमध्ये ४७ नवीन स्वच्छतागृहे बांधणे अत्यावश्यक असल्याबाबतचा प्रस्ताव गेल्या वर्षी ३१ आॅक्टोबरला गृह विभागाकडे पाठविला होता. त्याबाबत पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत होते.