होळीलाही नाही एसी डबल डेकर
By Admin | Updated: January 26, 2015 04:58 IST2015-01-26T04:58:11+5:302015-01-26T04:58:11+5:30
मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करत कोकणवासियांच्या दिमतीला आणलेल्या एसी डबल डेकर ट्रेन प्रवास्यांच्या थंड प्रतिसादामुळे चार महिन्यापासून वापराविना पडून राहिली आहे

होळीलाही नाही एसी डबल डेकर
मुंबई : मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करत कोकणवासियांच्या दिमतीला आणलेल्या एसी डबल डेकर ट्रेन प्रवास्यांच्या थंड प्रतिसादामुळे चार महिन्यापासून वापराविना पडून राहिली आहे. मनमानी पद्धतीने आकारण्यात येणाऱ्या तिकीट शुल्कामुळे प्रवास्यांनी पाठ फिरविल्याने देखभाल व दुरुस्तीच्या निमित्याने ती लोअर परळ वर्कशॉपमध्ये पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असलातरी त्यासाठी जागा नसल्याने कांदिवली स्थाानकाजवळ बेवारस्याप्रमाणे उभी आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या शिमग्यावेळी ती कोकणवासियांना उपलब्ध होणार नाही.
२0१४ मध्ये कोकणवासियांसाठी एसी डबल डेकर ट्रेन मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवात सुरु करण्यात आली. मात्र मागणीनुसार तिकिटांत वाढ होणारी प्रिमियम योजना लागू केल्याने कोकणवासियांनी त्याकडे अक्षरश: पाठ फिरवली. त्यामुळे या ट्रेनला प्रवाशांनी प्रतिसाद देण्यात यावा, अन्यथा ही ट्रेन मध्येच बंद केली जाईल, अशाप्रकारचे अजब पत्र कोकण रेल्वेकडूनही काढण्यात आले. त्यानंतर दिवाळीत ही ट्रेन नॉन प्रिमियम म्हणून चालविण्यात आली. मात्र दिवाळीत जाणाऱ्या कोकणवासियांची संख्या फारच कमी असल्याने या ट्रेनला अल्प प्रतिसाद मिळाला. या दोन सणासुदीत ट्रेन धावल्यानंतर तीला लोअर परेल वर्कशॉपमध्ये देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला.कुर्ला ते सीएसटी दरम्यान डबल डेकर ट्रेनसाठी जागाच नसल्याने ही ट्रेन लोअर परेल वर्कशॉपमध्ये पाठविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.दोन महिन्यांपूर्वी ही ट्रेन विरार येथे उभी ठेवली होती. त्यानंतर कांदिवली येथे आणल्यानंतर तेथून लोअर परेल वर्कशॉपमध्ये नेण्यात येणार होती. मात्र वर्कशॉपमध्येही या ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी जागा नसल्याने ही ट्रेन अद्यापही वेटिंग लिस्टवर असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे वर्कशॉपमध्ये यावर काम सुरु झाल्यानंतर साधारपणे एक ते सव्वा महिना बाहेर येण्यास लागेल, असेही अधिकारी म्हणाला. ही ट्रेन बाहेर आल्यानंतर पश्चिम-मध्य रेल्वे मार्गावर किंवा दक्षिणेत या ट्रेनच्या डब्यांची विभागणी करण्यावर विचार केला जात आहे.