पालिकेचे विभागही होणार हायटेक
By Admin | Updated: March 2, 2016 01:25 IST2016-03-02T01:25:54+5:302016-03-02T01:25:54+5:30
पालिकेचे विभागही होणार हायटेक

पालिकेचे विभागही होणार हायटेक
पुणे : महापालिकेतील विविध विभागांची कार्यप्रणाली हायटेक व्हावी याकरिता सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी ४ कंपन्यांची नियुक्ती करण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत जुने सॉफ्टवेअर अपडेट करणे तसेच नवीन सॉफ्टवेअर तयार करणे आदी कामे केली जाणार आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांचे सॉफ्टवेअर विकसन करण्यासाठी ऐनपॅनलमेंट एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. याकरिता एकूण ७ निविदा पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. तांत्रिक सल्लागार समितीने त्यांची गुणात्मक छाननी करून ४ कंपन्यांची निवड केली. सायबर टेच सिस्टिम अॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड, केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड, रोल्टा इंडिया लिमिटेड, सी-डॅक या ४ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्य शासनाकडून ई-गव्हर्नन्सचा पुरस्कार केला जात आहे. नागरिकांना जास्तीत जास्त आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यापार्श्वभुमीवर महापालिकेतील कामकाज प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राईम हाऊस वॉटर कुपर प्रा. लि. यांच्याकडून महापालिकेच्या समन्वय साधून संगणक प्रणालीचा आढावा घेतला जात आहे. याअंतर्गत प्रचलित संगणक प्रणाली अधिक विकसित करणे, काही प्रणाली नव्याने विकसित करणे आदी कामे पार पाडली जाणार आहे.
महापालिकेच्या कामकाज पध्दतीमध्ये यामुळे आमुलाग्र बदल होणार असल्याने नागरिकांना सेवा सुविधा मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर पालिकेतील कामे कमी वेळात पूर्ण होण्यास मदत होणार आहे.