‘इफ्फी’त उलडगतोय जुन्या कॅमेऱ्यांचा इतिहास

By Admin | Updated: November 26, 2014 00:44 IST2014-11-26T00:42:48+5:302014-11-26T00:44:39+5:30

दोनशे कॅमेरे : गोव्यातून आणखीन सात जुने कॅमेरे संग्रहात जमा; कोल्हापूरच्या टीमचे खास कौतुक

The history of the old cameras in the IFFI | ‘इफ्फी’त उलडगतोय जुन्या कॅमेऱ्यांचा इतिहास

‘इफ्फी’त उलडगतोय जुन्या कॅमेऱ्यांचा इतिहास

संदीप आडनाईक - पणजी -गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोल्हापूरच्या सर्वेश देवरुखकर यांच्या संग्रहातील दोनशेहून अधिक जुन्या कॅमेऱ्यांचे प्रदर्शन गोवा मनोरंजन सोसायटीच्या सभागृहात भरविण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून गोव्यातून आणखी सात जुने कॅमेरे त्यांच्या संग्रहात जमा झाले आहेत. मंगळवारी अभिनेता नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शिका समृध्दी पोरे, निखिल साने यांनी भेट देऊन कोल्हापूरच्या टीमचे खास कौतुक केले.
गोवा मनोरंजन सोसायटी आणि गोवा छायापत्रकार संघटनेमार्फत इफ्फीत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात १८९३ पासून ते २00२ पर्यंतचे सर्व पध्दतीचे कॅमेरे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये टीएलआर, एसएलआर, रेंज फाईडर, व्ह्यू कॅमेरा, लार्ज फॉर्मट, मिडिया फॉर्मट, ३५ एम. एम. ८ एम. एम. १६ एम. एम. स्पाय, ११0 एम. एम कॅमेऱ्यांचा समावेश आहे. आयकॉन, कोडॅक, पेन्टॅक, ममीया यासारखे कॅमेरे या प्रदर्शनात पहायला मिळतील. या प्रदर्शनात १८९३ चा सर्वात जुना कॅमेरा हंटर पेनरोज हे सर्वांचे आकर्षण आहे. शिवाय १९८0मधील अरबी हा सर्वाधिक महागडा कॅमेराही यात आहे. सर्वेशच्या आजोबांनी हा कॅमेरा ७0 हजार रुपयात विकत घेतला होता.
या प्रदर्शनाचे उद्घाटन गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक, अभिनेता उपेंद्र लिमये, यलोचे दिग्दर्शक महेश लिमये, राजेंद्र तालक, प्रियंका तालक, चंद्रकांत जोशी, एस. निंबाळकर यांनी भेट दिली. याशिवाय देशविदेशातील अनेक छायाचित्रकार प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली. विशेषत: उत्तरार्खडातील डेहराडून येथील निर्माते, दिग्दर्शक, लेखक डॉ. आर. के. शर्मा यांनी त्यांच्या संग्रहातील बाबुराव पेंटर व दादासाहेब फाळके यांच्या लाकडी कॅमेऱ्याची आठवण या प्रदर्शनामुळे ताजी झाल्याचे सांगितले.
प्रदर्शनाला गोमंतकीयांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे सर्वेश आणि त्याचे वडील संजीव देवरुखकर यांनी सांगितले. देवरुखकर यांच्यासोबत कोल्हापूरहून त्यांच्या मातोश्री अरुणा, बहिण स्नेहल, विजय टिपुगडे, नितीन भोसले, सागर कडव, जयंत भोसले ही टीम आली आहे. प्रदर्शन २७ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

पिढीजात संग्राहक
सर्वेश देवरुखकर यांच्या संग्रहात आजअखेर ७00 च्या आसपास कॅमेरे आहेत. यात बाबुराव पेंटर यांनी तयार केलेल्या कॅमेऱ्याशी साधर्म्य सांगणाऱ्या कॅमेऱ्यासह वृत्तपत्र छायाचित्रकारांसाठी आवश्यक असणारे तसेच आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात छोटा पोलोराईड कॅमेराही या संग्रहात आहेत. सर्वेश कोल्हापूरच्या दळवीज आर्टसमध्ये फाईन आर्टसचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील संजीव देवरुखकर यांनी यातील बहुतेक कॅमेरे संग्रहित केले आहेत. त्याचे आजोबाही कॅमेऱ्याचे सर्वात जुने संग्राहक होते.

Web Title: The history of the old cameras in the IFFI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.