ऐतिहासिक ठिकाणांची स्वच्छता
By Admin | Updated: April 28, 2016 03:17 IST2016-04-28T03:17:58+5:302016-04-28T03:17:58+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ऐतिहासिक ठिकाणांची स्वच्छता
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बुधवारी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ब्रिटिशकालीन इलठाणपाडा येथील धरण व परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे बेलापूर येथील किल्ला परिसरातही ही राबविण्यात आली. तत्पूर्वी याच मोहिमेचा एक भाग म्हणून मंगळवारी दिघ्यातील यादवनगर विभागात उघड्यावर शौचविधी करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात जोरदार स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात विविध विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव तथा स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख प्रवीण प्रकाश यांच्या निर्देशानुसार १६ ते ३0 एप्रिल या कालावधीत शहरातील ऐतिहासिक व धार्मिकस्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार बुधवारी इलठाणपाडा येथील ब्रिटिशकालीन धरण आणि बेलापूर येथील ऐतिहासिक किल्ला परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही ठिकाणच्या मोहिमेला दिघा विभाग अधिकारी गणेश आघाव, स्वच्छता निरीक्षक राजीव बोरकर, वीरेंद्र पवार तसेच बेलापूर विभाग अधिकारी एस. डी. आडागळ, कोपरखैरणे विभाग अधिकारी किशोर खाचणे उपस्थित होते.
दरम्यान, मंगळवारी दिघा येथील यादवनगरमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आाली. याअंतर्गत उघड्यावर प्रातर्विधी करणाऱ्या ११ जणांवर प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच उघड्यावर प्रातर्विधी केल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत यावेळी जनजागृतीही करण्यात आली. याच मोहिमेचा एक भाग म्हणून निर्बंध असलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या चार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत ऐरोली विभागातील दोन सामाजिक संस्थांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)