हिंजवडीत आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या

By Admin | Updated: April 26, 2017 02:59 IST2017-04-26T02:59:12+5:302017-04-26T02:59:12+5:30

हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला.

Hinjewadi IT company girl commits suicide | हिंजवडीत आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या

हिंजवडीत आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या

वाकड : हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नैराश्येपोटी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असले तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
मीनल अशोकराव देशमुख (वय २८, रा. अनंतानगर, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळची आंबेजोगाई) असे त्या तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. येत्या १८ मे रोजी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे काही दिवसांपासून ती रजेवर होती.
परफॉर्मन्स समाधानकारक नाही. त्यामुळे राजीनामा द्यावा, असा कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी मीनलला तगादा लावला होता. स्वत:हून राजीनामा दे अथवा कंपनी व्यवस्थापनाला कारवाई करणे भाग पडेल, असे तिला धमकावले जात असल्याने तिला नैराश्य आले होते. असे मीनलची बहीण प्रियांका हिचे म्हणणे आहे. प्रियंकाच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या घटने नंतर पोलिसांनीही कमालीची गुप्तता बाळगली असल्याने संशय बळावला आहे. (वार्ताहर)

Web Title: Hinjewadi IT company girl commits suicide