हिंदूच राहणार नाही, तर विकास काय कामाचा ?- तोगडिया
By Admin | Updated: December 30, 2016 21:06 IST2016-12-30T21:06:51+5:302016-12-30T21:06:51+5:30
डॉ. प्रवीण तोगडिया यांनी संघभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले.

हिंदूच राहणार नाही, तर विकास काय कामाचा ?- तोगडिया
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - एरव्ही रामराग आलपणारे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी संघभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले. देशात बहुसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार वाढले आहेत .केंद्र शासन विकास करत आहे. मात्र जर हिंदूच राहणार नाही, तर विकास काय कामाचा राहणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गुरुवारपासून नागपुरातील माँ. उमिया धाम येथे विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी मंचावर जितेंद्रनाथ महाराज, त्रिनिदादहून आलेले स्वामी अक्षतानंद, विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी, महामंत्री चंपत राय, विदेश विभागाचे कार्याध्यक्ष अशोक चौगुले, या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरातील कच्छी विसा मैदानावर त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
देशात विकास करत असताना हिंदूंच्या संरक्षणासाठी व समृद्धीसाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत. अनेक ठिकाणी हिंदू गाव व शहरांतून पलायन करत आहेत. अशीच स्थिती राहिली तर अल्पसंख्यांक आयोगाप्रमाणेच बहुसंख्यांक हक्क संरक्षण आयोगाची स्थापनादेखील करावे लागेल, असे ते म्हणाले. विहिंपने सुरक्षित हिंदू-समृद्ध हिंदू हा संकल्प घेतला आहे. याअंतर्गत ६ सूत्री कार्यक्रम आखला आहे. यात गरीब हिंदूंसाठी भोजन, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, बेरोजगारांसाठी रोजगार, व्यापाऱ्यांची प्रगती आणि शेतकऱ्यांचा विकास या मुद्द्यांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.