डोंगरकडा कोसळला; मांडवीला पूर

By Admin | Updated: July 11, 2016 00:48 IST2016-07-11T00:48:46+5:302016-07-11T00:48:46+5:30

पिंपळगाव जोगा धरण क्षेत्रात असलेल्या कोल्हेवाडी नं. १ येथे शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे डोंगरकडा कोसळून सर्व माती, दगड, झाडंझुडपं खाली कोसळून तयार झालेला हा राडारोडा कोल्हेवाडी

The hill collapses; Mandviila flood | डोंगरकडा कोसळला; मांडवीला पूर

डोंगरकडा कोसळला; मांडवीला पूर


खोडद : पिंपळगाव जोगा धरण क्षेत्रात असलेल्या कोल्हेवाडी नं. १ येथे शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे डोंगरकडा कोसळून सर्व माती, दगड, झाडंझुडपं खाली कोसळून तयार झालेला हा राडारोडा कोल्हेवाडी गावालगत आला. अवघ्या १० ते १५ मीटर अंतरावर गाव राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी : पिंपळगाव जोगा धरण क्षेत्रात कोल्हेवाडी नं. १ हे पुनर्वसित गाव शेजारील डोंगरालगत आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ६०० ते ७०० आहे. या परिसरात मागील २-३ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारीदेखील रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास येथे प्रचंड मोठा आवाज झाला. रात्रीची वेळ असल्याने आणि बाहेर पडणारा धो धो पाऊस यामुळे कोणीही घराबाहेर आले नाही. सकाळी पाहिल्यानंतर शेजारील डोंगराचा कडा कोसळून त्यातील माती, दगड, झाडंझुडपं गावापासून अवघ्या काही अंतरावर आले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगराच्या कड्यातील मातीची दलदल तयार होऊन सर्वत्र चिखल झाला होता. हे दृश्य पाहिल्यानंतर माळीण दुर्घटनेची तीव्रतेने आठवण झाली. डोंगरकड्यातील झाडंझुडपं पावसाच्या पाण्याने खाली वाहून येऊन गावातील पुलांमधील असणाऱ्या मोऱ्यांमध्ये अडकल्याने वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह अडला आणि झाडाझुडपांना अडकलेले पाणी गावाकडे फिरले. तुंबलेल्या पाण्याचा कोल्हेवाडी गावातील शाळा व ४ घरांना वेढा बसला. या घटनेत येथील जयराम भालेराव व त्यांचे इतर भाऊ अशी चार कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

जुन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली होती. पिंपळगाव जोगा धरणाशेजारील कोल्हेवाडी गावच्या डोंगराचा कडा पावसामुळे कोसळला. सुदैवाने गाव दूर असल्याने मोठी दुर्घटना टळली. पाण्याच्या प्रवाहाबरोबवर आलेली माती सर्व गावात पसरली होती. पावसाच्या तीव्रतेमुळे २० वर्षांनंतर मांडवी नदी दुथडी भरून वाहत होती, तर चिल्हेवाडी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत होते.

ओतूर परिसरात अतिवृष्टी
ओतूर : रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडवडे नदीला २० वर्षांनंतर पूर येऊन ती दुथडी भरून वाहत आहे. पावसामुळे ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर तसेच उत्तर विभागातील आदिवासी चिल्हेवाडी, उदापूर, करंजाळे, खिरेश्वर आदी भागांतही कालपासून जोरदार वृष्टी होत असल्यामुळे या भागातील सर्व ओढे, नदी दुथडी भरून वाहत आहेत. ओतूर विभागात गेल्या २४ तासांत १२१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. अजूनही पाऊस सुरूच आहे. ओतूर येथे काल दिवसभर मधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी येत होत्या. परंतु सायंकाळी ७ वाजता जो मुसळधार पाऊस सुरू झाला. ओतूर येथील मांडवी नदीला पूर आल्यामुळे कपर्दिकेश्वर मंदिराजवळून शेरेवाडी आदी गावाकडे मांडवी नदीवर बांधलेल्या साकव पुलावरून पाणी वाहत होते.लोकांचा ओतूरशी संपर्क सध्या तुटला आहे. कपर्दिकेश्वर मंदिराजवळ श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे जोर घाट आहे तो पूर्णपणे पुराच्या पाण्यात गेला आहे. श्रीराम मंदिराच्या पाणीमागील बाजू पाणी शिरले. २0 वर्षानंतर पूर पाहण्यास कपर्दिकेश्वर मंदिरात मोठी गर्दी झाली. येथील स्मशानभूमी पूर्ण पाण्यात गेली आहे.
ओतूर येथील जुन्नरवेशीच्या जवळच के. टी. बंधाऱ्यावर पाणी वाहत आहे. या पुराचे पाणी जुन्नरवेशीजवळ, पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत होते. आता ते कमी झाले. भोर ओतूर येथील स्मशानभूमीही पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहे.
ओतूरच्या पूर्व भागात शेती आहे. या शेतीतील अनेक शेतकऱ्यांचे शेती बंधारे फुटले. त्यांचे पाणी व डोमेवाडीकडे जाणारा जुना रस्ता व त्या ओढ्याला पाणी आल्याने ओतूर ब्राह्मणवाडा चौकातील गोदरेज आधारजवळ पाणी साठल्याने या मार्गाची वाहतूक बंद झाली.

चोवीस तासांतील पावसाची सरासरी
जुन्नर : १३१ मिमी, एकूण २३५ मिमी.
नारायणगाव : ६८ मिमी, एकूण १७८ मिमी
ओतूर : १२१ मिमी,
एकूण २८२ मिमी
वडगाव आनंद : ४० मिमी, एकूण १६० मिमी
बेल्हा : ३६ मिमी, एकूण १७० मिमी
निमगावसावा : ३५ मिमी, एकूण १२१ मिमी
डिंगोरे-मढ : १९० मिमी, एकूण ४५४ मिमी
आपटाळे : ११० मिमी, एकूण ३१३ मिमी
राजूर-अजनावळे : ३०४ मिमी, एकूण ८७३ मिमी.

Web Title: The hill collapses; Mandviila flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.