मुंबई मेट्रोची भाडेवाढ तूर्तास टळली, तीन महिने तरी दर 'जैसे थे'
By Admin | Updated: July 20, 2015 14:39 IST2015-07-20T14:35:27+5:302015-07-20T14:39:11+5:30
मुंबई मेट्रोची भाडेवाढ तूर्तास टळली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत तरी मेट्रोचे दर 'जैसे थे'च राहणार आहेत.

मुंबई मेट्रोची भाडेवाढ तूर्तास टळली, तीन महिने तरी दर 'जैसे थे'
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - मुंबई मेट्रोची भाडेवाढ तूर्तास टळली असून येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत तरी मेट्रोचे दर 'जैसे थे'च राहणार आहेत. या निर्णयामुळे मेट्रोच्या प्रवाशांना सध्या दिलासा मिळाला असला तरी दिवाळीच्या सुमारास भाडेवाढीसंदर्भात पुढील निर्णय होऊन प्रवाशांच्या खिशाला चाट बसण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या ( MMOPL) च्या बोर्ड अधिका-यांच्या आज झालेल्या बैठकीत पुढील तीन महिन्यांसाठी मेट्रोचे दर न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मेट्रोच्या तिकिटाचे दर वाढविण्यावरून रिलायन्स इन्फ्रा आणि एमएमआरडीएमध्ये वाद झाला होता. अखेर एमएमआरडीएने मुंबई उच्च न्यायालयात दरवाढीविरोधात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने एमएमआरडीएची याचिका फेटाळून लावल्याने रिलायन्सने गतवर्षी जुलैमध्ये तिकिटाचे दर वाढविले. सध्या मेट्रोचे किमान तिकीट १0 रुपये आणि कमाल तिकीट ४0 रुपये आहे. रिलायन्सने पुन्हा तिकीट दरवाढीचा प्रयत्न केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दरनिश्चिती समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्राने मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ई. पद्मनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल मुंबई मेट्रो वन प्रा. लि. (एमएमओपीएल)कडे सादर केला आहे. या समितीने किमान १0 ते कमाल ११0 रुपयांपर्यंत भाडेवाढीस हिरवा कंदील दाखवला होता. मात्र आज झालेल्या बैठकीत पुढील तीन महिने तरी हे दर न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे ती महिने तरी मेट्रोचे तिकीट किमान १० रुपये तर कमाल ४० रुपये इतकेच राहणार आहे.