अपहरणकर्ते मागणार होते पाच कोटी
By Admin | Updated: February 5, 2015 01:05 IST2015-02-05T01:05:07+5:302015-02-05T01:05:07+5:30
पाचपावली पोलिसांच्या तावडीत अडकलेले आरोपी एका प्रॉपर्टी डीलरच्या १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणार होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

अपहरणकर्ते मागणार होते पाच कोटी
प्रॉपर्टी डीलरच्या मुलाचे अपहरण प्रकरण
नागपूर : पाचपावली पोलिसांच्या तावडीत अडकलेले आरोपी एका प्रॉपर्टी डीलरच्या १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणार होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
मंगळवारच्या सायंकाळी डिओने तीन अल्पवयीन मुले संशयास्पद स्थितीत जाताना गवसताच पोलिसांनी त्यांना अडवले होते. त्यांच्या झडतीत रंगीत स्प्रे आढळून येताच पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत त्यांनी पाच कोटींच्या खंडणीसाठी प्रॉपर्टी डीलरच्या मुलाच्या अपहरणाची योजना उघड केली. दरम्यान, हे आरोपी पोलिसांच्या हाती लागण्यास तासभर विलंब झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता, असेही उघड झाले.
या अपहरणकर्त्या टोळीचा सूत्रधार बाराव्या वर्गात शिकणारा १७ वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला असून, तो कधी आईकडे तर कधी वडिलांकडे राहतो. त्यामुळेच तो वाममार्गाला लागला. त्याने डिओ चोरण्यापूर्वी तीनचाकी वाहन चोरले होते. परंतु या वाहनाची विक्रीच झाली नव्हती. त्यामुळे त्याने मोठे काम करण्याची शक्कल लढवली.
त्याची एका प्रॉपर्टी डीलरवर नजर होती. त्याच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याची या अपहरणकर्त्याला माहिती होती. हा प्रॉपर्टी डीलर आपल्या मुलावर अतोनात प्रेम करतो, असेही त्याला माहीत होते. या मुलाचे अपहरण केल्यास आपले नशीबच बदलून जाईल आणि पाच कोटी रुपये हा प्रॉपर्टी डीलर सहज देऊ शकतो, असे त्याला वाटत होते. आठवडाभरापूर्वीच त्याने आपल्या चार साथीदारांसोबत एकत्र बसून अपहरणाची योजना आखली होती. त्याने सर्वांना त्यांची कामे वाटून दिली होती.
या प्रॉपर्टी डीलरला दोन मुले आणि दोन मुली आहेत. सर्वात लहान मुलगा १४ वर्षांचा तो आठव्या वर्गात शिकतो. तो आणि त्याची मोठी बहीणही एकाच शाळेत शिकतात आणि पायीच एकत्रच शाळेत जातात; त्यामुळे अपहरणकर्त्यांनी या मुलाचे अपहरण करण्याची योजना आखली होती.
अपहरणकर्त्यांनी प्रॉपर्टी डीलरच्या भावाचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला होता. अपहरणासाठी त्यांनी मोतीबाग भागातून डिओ मोपेड चोरली होती. डिओचा रंग बदलण्यासाठी त्यांनी सेंट्रल एव्हेन्यूवरून २०० रुपयात दोन रंगीत स्प्रे खरेदी केले होते. त्यांच्याकडील रंग सायकलचा असल्याने एका पेंटरने डिओला पेंट करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ते दुसरा पेंटर शोधू लागले आणि पोलिसांच्या तावडीत अडकले.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास अपहरण करण्याची या टोळीची योजना होती. याच काळात हा मुलगा शाळेतून घराकडे परतायचा. परंतु त्यांची वेळ चुकली आणि ज्या मुलाचे ते अपहरण करणार होते तो आपल्या घरी परतला होता. त्यानंतर त्यांनी सायंकाळच्या वेळी अपहरणाची योजना आखली होती. मुलगा सायंकाळी ५ वाजता मोमीनपुरा कब्रस्तानमार्गे मदरसा येथे जातो, असे त्यांना समजले होते.
मुलाचे अपहरण केल्यानंतर दोघे त्याला वर्धा मार्गाने घेऊन जाणार होते. त्यानंतर प्रॉपर्टी डीलरला जाफरनगरच्या स्विमिंग पुलाजवळ बोलावून त्याच्याकडून खंडणी वसूल केली जाणार होती. (प्रतिनिधी)