सरपंचपदाच्या उमेदवार महिलेचे अपहरण व सुटका
By Admin | Updated: August 15, 2015 00:57 IST2015-08-15T00:57:42+5:302015-08-15T00:57:42+5:30
तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या दावेदार महिला उमेदवाराचे चार अज्ञात

सरपंचपदाच्या उमेदवार महिलेचे अपहरण व सुटका
गुहागर (रत्नागिरी) : तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या दावेदार महिला उमेदवाराचे चार अज्ञात तरुणांनी अपहरण केले आहे. शेतामध्ये काम करीत असताना त्यांचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद तिच्या सासू सुभद्रा महादेव मास्कर (६०) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली होती.
अपहरण झालेली महिला उमेदवार बुधवारी सायंकाळी घरी परतली असल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे. अपहरणकर्त्यांनी तिला सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिच्या गावापासून ४ ते ५ कि.मी. अंतरावरील आबलोली नाका येथे सोडले. तेथून ती आपल्या घरी गेली. ती पोलीस स्थानकात आल्यानंतर पुढील माहिती घेतली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
निवडून आलेल्या सात सदस्यांपैकी गाव पॅनेलकडून तीन पुरुष सदस्य व एक महिला सदस्याचा समावेश आहे. शिवसेनेकडून तीनही महिला सदस्या निवडून आल्या आहेत. सरपंचपदासाठी सर्वसाधारण स्त्री आरक्षण असल्याने निवडून आलेली कोणीही महिला सरपंच होऊ शकते. अशा स्थितीत गाव पॅनेलकडे चार सदस्य असल्याने गाव पॅनेलचाच सरपंच होणार हे निश्चित होते. या पार्श्वभूमीवर राजकीय चढाओढीतून हे अपहरण झाले असावे, असे बोलले जात आहे.
सुभद्रा भास्कर यांच्यासमवेत शेतात काम करीत असताना २२ ते २५ वयोगटातील चार अनोळखी तरुणांनी येऊन ‘विजय मसुरकर यांनी बोलावले आहे,’ असे सांगून या महिलेला वाहनाने घेऊन गेले. उशिरापर्यंत सून घरी परत न आल्याने रात्री अकरा वाजता गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)