ट्रेलर बंद पडल्याने द्रुतगती महामार्ग ठप्प
By Admin | Updated: September 6, 2016 03:50 IST2016-09-06T03:50:29+5:302016-09-06T03:50:29+5:30
अवजड सामान वाहून नेणारा ट्रेलर बंद पडल्याने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरची वाहतूक आठ तास ठप्प झाली.

ट्रेलर बंद पडल्याने द्रुतगती महामार्ग ठप्प
लोणावळा (पुणे) : अवजड सामान वाहून नेणारा ट्रेलर बंद पडल्याने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरची वाहतूक आठ तास ठप्प झाली. अमृतांजन पुलाजवळील उतारावर हा ट्रेलर बंद पडल्याने सकाळी ६.१५ पासून वाहतूक ठप्प झाली. ट्रेलर बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे निकराचे प्रयत्न पोलिसांनी केले, परंतु ट्रेलर अवजड असल्याने तेही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खंडाळा व बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूलदरम्यान उतारावर पहाटे हा ट्रेलर बंद पडला. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन मार्गिका प्रथम बंद झाल्या.(प्रतिनिधी)
त्यानंतर वाहतूक वाढल्याने काही वेळातच तिसऱ्या मार्गिकेवरही वाहतूक कोंडी होऊन संपूर्ण महामार्ग ठप्प झाला. गणेशोत्सवानिमित्त गावांकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना या वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. ट्रेलर बाजूला करण्यासाठी पोलिसांंनी निकराचे प्रयत्न केले. मात्र, ट्रेलरमधील सामान अत्यंत अवजड असल्याने त्यांना यश आले नाही. मोठी क्रेन लावूनही ट्रेलर जागचा हालत नव्हता. दुपारी दोनपर्यंत मोठ्या क्रेनने ट्रेलर बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक संथ गतीने सुरू झाली. त्यानंतरही सुमारे दोन-तीन तास वाहतूक सुरळीत झाली नव्हती.
लोणावळ््यातही वाहतूककोंडी
द्रुतगती महामार्ग ठप्प झाल्यानंतर पोलिसांनी मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक वलवण गावाजवळून लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर वळवली. यामुळे लोणावळ्यातही काही वेळ मोठी वाहतूककोंडी झाली होती. (प्रतिनिधी)