मुंबई : उच्च शिक्षणाची परीक्षा पद्धत बदलण्याचा विश्व विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) मानस आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने उच्च शिक्षण संस्थांचे शिक्षक, विद्यार्थी, परीक्षा नियंत्रक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सामान्य लोकांकडूनही सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत.उच्च शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक पद्धतीत बदल करण्यासाठी सध्या यूजीसी प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत. त्यातीलच एक पद्धत म्हणजे ‘लर्निंग आऊटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्क.’ या पद्धतीचे नियमित अवलोकन आणि विकास करणे आणि त्यातून परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करणे हे अनुदान आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून उच्च शिक्षण संस्थांच्या परीक्षा पद्धतीत बदल घडवताना एकरूपता आणण्यासाठी विविध स्तरांतून सूचना आणि शिफारशी अनुदान आयोगाने मागवल्या आहेत.सूचना, शिफारशीसाठी उच्च शिक्षणाच्या परीक्षांच्या उद्दिष्टांचे चार संकल्पनांमध्ये वर्गीकरण केले आले असून त्यात परीक्षा पद्धती कशी असावी, कोणत्या प्रकारची तांत्रिक रचना असावी, प्रश्नपेढ्या कशा असाव्यात, निकालाची पद्धती कशी असावी यावर विचारणा केली आहे.अशी असेल रचना : पहिल्या संकल्पनेअंतर्गत परीक्षा पद्धतीची उद्दिष्टे, भारतात वापरता येऊ शकणारे परीक्षेचे मॉडेल्स, परीक्षा पद्धतीमध्ये करता येऊ शकणारे स्ट्रक्चरल आणि प्रक्रियात्मक बदल यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या संकल्पनेत परीक्षा पद्धतीत करता येणारे ग्रेड आणि क्रेडिट ट्रान्सफर, नियंत्रण पद्धती, आॅन डिमांड परीक्षा, अंतर्गत व बाह्य परीक्षा पद्धती यावर विचारविनिमय होईल. याचप्रमाणे तंत्रज्ञानावर आधारित परीक्षा पद्धती, प्रश्नपेढी, दर्जात्मक इन्फ्रास्ट्रक्चर, पदवीधारकांसाठी आवश्यक अशी क्षमता चाचणी याचा तिसºया संकल्पनेअंतर्गत तर मूल्यांकन पद्धती, निकाल, गुणपत्रिका आणि पदवी याबाबत चौथ्या संकल्पनेअंतर्गत अभ्यास करून त्यानुसार नवी परीक्षा पद्धत अमलात आणण्यात येईल.
उच्च शिक्षणाची परीक्षा पद्धत बदलणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 05:52 IST