अनिल परब यांच्या मानहानी दाव्यावर हायकोर्टाने किरीट सोमय्यांना बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:58 AM2021-10-02T06:58:40+5:302021-10-02T06:59:19+5:30

सोमय्या यांनी २३ डिसेंबर रोजी या दाव्यावरील सुनावणीस स्वतः हजर राहावे किंवा वकिलांना हजर करावे, असे न्यायालयाने नमूद केले.

The High Court issued summons to Kirit Somaiya on Anil Parabs defamation suit pdc | अनिल परब यांच्या मानहानी दाव्यावर हायकोर्टाने किरीट सोमय्यांना बजावले समन्स

अनिल परब यांच्या मानहानी दाव्यावर हायकोर्टाने किरीट सोमय्यांना बजावले समन्स

Next
ठळक मुद्देसोमय्या यांनी २३ डिसेंबर रोजी या दाव्यावरील सुनावणीस स्वतः हजर राहावे किंवा वकिलांना हजर करावे, असे न्यायालयाने नमूद केले.

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्यांना समन्स बजावले. सोमय्या यांनी २३ डिसेंबर रोजी या दाव्यावरील सुनावणीस स्वतः हजर राहावे किंवा वकिलांना हजर करावे, असे न्यायालयाने नमूद केले.

सोमय्या हेतुपूर्वक बदनामी करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी सोमय्या आपली प्रतिष्ठा मलिन करीत आहेत.  त्यांना बिनशर्त माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी परब यांनी केली आहे. 

उच्च न्यायालयाच्या प्रोथोनोटरी व सिनियर मास्टर यांनी शुक्रवारी सोमय्या यांना समन्स बजावले. या दाव्यावरील सुनावणी २३ डिसेंबर २०२१ रोजी योग्य त्या न्यायमूर्तींपुढे होईल. त्या दिवशी  तुम्ही स्वतः किंवा वकिलाद्वारे उपस्थित राहा, असे समन्समध्ये म्हटले आहे. भविष्यात आपल्याविरोधात असे कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करण्यास सोमय्या यांना मनाई करावी, अशीही मागणी परब यांनी दाव्याद्वारे केली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रिसॉर्ट बांधकामाबाबत झालेल्या घोटाळ्यात अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप सातत्याने सोमय्या सोशल मीडियाद्वारे करीत आहेत. मे २०२१ पासून ते अशा प्रकारच्या बदनामीकारक पोस्ट करीत असल्याचे परब यांनी  म्हटले आहे. 

आपला या रिसॉर्ट बांधकामाशी काहीही संबंध नाही. तरीही सोमय्या यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट मोठ्या प्रमाणावर सगळीकडे प्रसारित करण्यात आल्या. सोमय्या यांनी केलेल्या खोट्या आरोपांबाबत  सत्तेत असलेल्या ज्येष्ठांनी व सहकाऱ्यांनी तसेच पक्षाकडून व कुटुंबीयांकडून आपल्याला अनेक शंकांना सामोरे जावे लागले. आपण एक नेते म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहोत, असे परब यांनी दाव्यात म्हटले आहे.

Web Title: The High Court issued summons to Kirit Somaiya on Anil Parabs defamation suit pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.