उच्चांकी ४०.९ :नाशिककरांना उन्हाचा तडाखा
By Admin | Updated: April 13, 2017 22:04 IST2017-04-13T22:02:15+5:302017-04-13T22:04:40+5:30
मागील पाच वर्षांमध्ये प्रथमच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा नाशिककरांना सोसाव्या लागत आहे.

उच्चांकी ४०.९ :नाशिककरांना उन्हाचा तडाखा
नाशिक : शहरात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा कायम असून, उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. गुरुवारी (दि.१३) शहरात हंगामातील उच्चांकी ४०.९ इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली. मागील पाच वर्षांमध्ये प्रथमच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा नाशिककरांना सोसाव्या लागत आहे.
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीन दिवस सुमारे ४०.३ अंशांवर शहराचे तपमान होते. त्यानंतर प्रथमच बुधवारी ४०.७ अंशांवर पारा सरकला आणि गुरुवारी दोन अंशांनी वाढ होऊन पारा ४१ अंशांच्या आसपास पोहचला आहे. एकूणच दररोज वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नाशिक उष्ण बनले आहे.
वाढत्या उन्हाची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहिल्यास पुन्हा उष्णतेची लाट आल्याची घोषणा सरकारी पातळीवरून होण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रथमच ४०.९ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १९ एप्रिल रोजी ४१ हा उच्चांक नोंदविला गेला होता. अद्याप चालू महिन्याचे तीन आठवडे शिल्लक असल्याने गेल्या वर्षाच्या कमाल तपमानाचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तपमानाच्या उच्चांकाचा आढावा
वर्ष - कमाल तपमान
२००८ = २४ एप्रिल -४१.४
२००९ = १९ एप्रिल- ४१.४
२०१० = १६ एप्रिल -४२.०
२०११ = २७ एप्रिल - ४०.४
२०१२ = ८ एप्रिल - ४०.०
२०१३ = १ मे - ४०.६
२०१४ = ७ मे -४०
२०१५ = २० एप्रिल ४०.६
२००१६ = १९ एप्रिल /१८ मे - ४१.०