अरे, कुठं नेऊन ठेवलाय...?
By Admin | Updated: October 6, 2014 22:30 IST2014-10-06T22:22:52+5:302014-10-06T22:30:40+5:30
सरकारनामा

अरे, कुठं नेऊन ठेवलाय...?
पंधरा वर्षं घड्याळाचे काटे ‘जैसे थे’च असल्याचा शोध नरेंद्रभार्इंनी तासगावात लावला. त्यांना काय माहीत, की पवारसाहेब काळाच्या पुढं धावण्यात माहीर आहेत... आणि सांगलीतल्या घड्याळाचे काटे तर ‘फुल्ल स्पीड’नं फिरतात! इथल्या घड्याळातला तासकाटा आणि मिनीटकाटा इस्लामपूरचे साहेब आणि आबा आलटून-पालटून फिरवतात, पण सेकंदकाटा फिरवणारी फळी कमळाबाईकडं पळालीय. (कोण आहे रे तो, या फळीला ‘सोनेरी टोळी’ म्हणणारा? संजयकाकांना सांगू काय?) त्यामुळं नेमका सेकंदकाटा जोरानं फिरतोय की थांबलाय, हेच कळत नाही. घड्याळात ‘बारा’ वाजले नसले तरी घड्याळाचे मात्र ‘बारा’ वाजतात की काय, असं वाटायला लागलंय! संजयकाकांचा हात धरून घोरपडे सरकार, जगतापसाहेब, पृथ्वीराजबाबांनी कमळाबाईचा अड्डा जवळ केला. विट्याच्या अनिलभाऊंनी गडबडीनं ‘मातोश्री’ गाठली... आता दिनकरतात्या आणि शेंडग्यांच्या रमेशनंही ‘नमोऽऽ नमोऽऽ’ सुरू केलंय. सेकंदकाटा फिरवणाऱ्या या फळीचं हे ‘स्पीड’ बघून जिल्हाध्यक्ष शिंदेसाहेब वैतागलेत. (खरं तर या सगळ्यांना कमळाबार्इंचा अड्डा कुणी दाखवला, हे त्यांना पक्कं माहीत आहे, पण बोलणार कोण? इस्लामपूरकडं बोट दाखवलं तर आष्ट्याची जहागिरीही काढून घेतली जायची!) काल पवारसाहेबांनी जिल्ह्यातल्या जागांचं माप विचारलं. त्यावेळी मात्र शिंदेसाहेबांनी हा वैताग कथन केलाच... (अर्थातच इस्लामपूरकडं बघत)
आधी काकाला पाठवलं, मग एकेकानं साथ सोडली
ऐकलं नाहीत ना, बघा पदराची घडी कशी मोडली.
कुठं फेडाल हे पाप, कसं ओलांडायचं हे माप...
अरे, कुठं नेऊन ठेवलंय... घड्याळ माझं?
तिकडे कमळाबाईच्या अड्ड्यावर झुंबड उडली होती. लँड रोव्हर, स्कॉर्पिओ, इनोव्हा, पजेरो, फोक्स वॅगनमधून हापचड्ड्या घातलेले नवीन पाहुणे उतरू लागले आणि अड्डा सांभाळणारे पांढरा सदरा, खाकी चड्डीतले काळी टोपीवाले हडबडले. अड्ड्यावर नव्यानं आलेल्यांनी जुन्यांच्या जागा हिसकावल्या. हैराण झालेली खोडं मात्र एकमेकांना दूषणं देऊ लागली...
आप्पा आला, तेव्हाच आपली विकेट पडली
प्रत्येक इलेक्शनला इस्लामपूरची संगत नडली
काका आला, बाबा आला, तात्या आला, सरकार आलं
जीवापरीस जपलेल्या कमळाचं वाटोळं झालं...
अरे, कुठं नेऊन ठेवलाय... अड्डा माझा?
जाता-जाता : सांगलीत सुरेशअण्णांच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या. कधी राजमती भवन, तर कधी केडब्ल्यूसी. कधी कुपवाडची बस्ती, तर कधी नांद्र्याचा दर्गा. साहेबांसोबत बैठक मात्र होत नव्हती. रात्री-अपरात्री बजाज कंपनीकडून निरोप यायचा... तिकडं जाऊन ताटकळत थांबायचं. पहाटे डोळा लागत असताना कळायचं की, साहेब इस्लामपुरातनं बाहेर पडलेलेच नाहीत! एवढ्या येरझाऱ्या मार्केट यार्डात मारल्या असत्या तर गुळाच्या चार ढेपा तर खपल्या असत्या! काल सुरेशअण्णाही वैतागून बजाज कंपनीला म्हणाले...
साहेबांचं गणित कळेनासं झालंय
कुणाला पाडायचं वळेनासं झालंय
हात, धनुष्याला झटका द्यायचा
की, कमळाकडंच हौद न्यायचा...
अरे, कुठं नेऊन ठेवलाय... प्रचार माझा?
- श्रीनिवास नागे