हे राम ! प्रभूंच्या राज्यात इथेही गोंधळ
By Admin | Updated: December 22, 2016 17:15 IST2016-12-22T17:02:11+5:302016-12-22T17:15:48+5:30
लोकार्पण सोहळ्यादरम्यान शिवसेना, भाजपा, विहिंपच्या कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम, वंदे मातरम्, जय भारत सारख्या जोरदार घोषणाबाजी

हे राम ! प्रभूंच्या राज्यात इथेही गोंधळ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान नव्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या आज झालेल्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान शिवसेना, भाजपा, विहिंपच्या कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम, वंदे मातरम्, जय भारत सारख्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.
शिवसेना नेते मंचावर भाषण देण्यासाठी येताच शिवसैनिकांकडून जय श्रीराम आणि बाळासाहेब ठाकरेंचा जयघोष करण्यात आला. तर विद्या ठाकूर मंचावर येताच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जय मोदी अशी घोषणा देण्यात आलीय. या घोषणाबाजीदरम्यान भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. घोषणाबाजीवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. या उद्घाटन सोहळ्याला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, विद्या ठाकूर आदी नेते उपस्थित होते. राम मंदिर रोड स्थानकाच्या नामकरण आणि उभारणीच्या श्रेयावरून शिवसेना व भाजपात सोशल मीडिया आणि होर्डिंग्जबाजीवरून चांगलीच जुंपली होती.
दरम्यान, राम मंदिर स्थानक हार्बरवासीयांबरोबरच पश्चिम रेल्वे प्रवाशांनाही उपलब्ध होणार आहे. अजूनही गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार न झाल्याने हे स्थानक प्रथम पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठीच उपलब्ध असेल. या स्थानकवर धिम्या लोकल थांबतील. या नव्या रेल्वे स्थानकाचा जोगेश्वरी ते गोरेगावमध्ये राहणा-या रेल्वे प्रवाशांना मोठ्या फायदा होणार आहे.