चोरट्यांच्या मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी
By Admin | Updated: July 31, 2016 01:05 IST2016-07-31T01:05:02+5:302016-07-31T01:05:02+5:30
पूर्व भागातील काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली

चोरट्यांच्या मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी
मंचर : पूर्व भागातील काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली. चोरट्यांच्या मारहाणीत शिवाजी सखाराम हिंगे (वय ६५) व मंदाबाई शिवाजी हिंगे (वय ६०) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
काठापूर बुद्रुक येथे रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गणेशवस्ती येथे महादेव गोपाळ मुळूक यांचे घर आहे. मुळूक मुंबईला राहत असल्याने घराला कुलूप होते. कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. त्यांनी आतील कपाट फोडले आहे. घरमालक मुंबईला असल्याने किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती समजली नाही. ज्ञानेश्वर भागा जाधव यांची दोन घरे आहेत. एका घरात जाधव कुटुंबीय झोपले होते. दुसऱ्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील शेंगदाणे व लहान मुलांचे कपडे चोरून नेले. पांडुरंगवस्ती येथील लहू जंगल जाधव यांच्या घराची कडी चोरट्यांनी तोडली. मात्र आवाज झाल्याने लहू यांची पत्नी जागी होऊन तिने आवाज दिला, त्यामुळे चोरट्यांना पळ काढावा लागला.
गणेश शिवाजी हिंगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश गट्टे व पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींसंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याची माहिती गोडसे यांनी दिली.
>गणेशनगर येथे शिवाजी सखाराम हिंगे राहतात. पहाटे ३ वाजता दोन चोरट्यांनी चहाच्या टपरीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. चोरट्यांनी घरात जाऊन शिवाजी व मंदाबाई यांना हत्याराने मारहाण केली.
त्यांना तातडीने उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे पाठवण्यात आले आहे. चोरट्यांनी टपरीतील साहित्य अस्ताव्यस्त टाकले. मंदाबाई हिंगे यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने चोरून नेले.